देवलापार : रामटेक तालुक्यातील तोतलाडोह जलाशयात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी सोमवारी सायंकाळी केलेल्या गोळीबारात एका मासेमाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. जाळपोळ करण्याचाही प्रयत्न झाला. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संतप्त जमाव पाहता अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. दोषी वन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली. याप्रकरणी अखेर देवलापार पोलिसांनी वन कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदविला. तरीही नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. हरिनंद सुंदरलाल बनवारी (३२, रा. रयतवाडी, नवीन तोतलाडोह, ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. हरिनंद हा त्याच्या काही सहकाऱ्यांसह तोतलाडोह जलाशयात मासेमारी करण्यासाठी जाळे टाकत असताना स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी त्याला मज्जाव केला. यात बाचाबाची झाल्यानंतर काही वेळाने एसटीपीएफच्या जवानांनी मच्छीमारांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात हरिनंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता देवलापार पोलिसांनी हरिनंदचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठविला होता. हरिनंदचा मृतदेह मंगळवारी देवलापार येथे आणायला उशीर झाल्याने रयतवाडीतील नागरिक संतप्त झाले. दरम्यान, त्यांनी पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करीत सायंकाळी ६ वाजतापासून रास्ता रोकोला सुरुवात केली. त्यामुळे नागपूर-जबलपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती; शिवाय रयतवाडी येथेही तणाव निर्माण झाला होता. मृतदेह देवलापार येथे आणल्यानंतर संतप्त नागरिकांनी दोषी कर्मचाऱ्याला त्वरित अटक करण्याची मागणी केली.
रयतवाडीत तणाव
By admin | Published: February 25, 2015 2:38 AM