नागपूर : टॅक्सी व्यवसाय गेल्या दीड वर्षापासून रुळावर आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने टॅक्सी सर्व्हिसच्या संचालकांनी प्रति किलोमीटर दोन रुपयांची वाढ केली आहे. कोरोना कमी झाल्यामुळे पर्यटनस्थळ सुरू झाली तरी टॅक्सीच्या दरवाढीने ग्राहकी मंदावली आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. सलग पोच महिने तर प्रवासावर निर्बंध होते. त्यानंतर दुसरी लाट आली. ती इतकी जीवघेणी ठरली की लोकांची बाहेर पडण्याची हिम्मत झाली नाही. त्यामुळे टॅक्सीचा व्यवसाय पूर्णवेळ ठप्प झाल्यासारखाच होता. जून महिन्यानंतर कोरोनाचा ओघ ओसरायला लागला. पर्यटनस्थळे सुरू झाली. लोकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली, पण पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने टॅक्सी सर्व्हिसेस वाल्यांनी सुद्धा दरवाढ केली. ही दरवाढ ग्राहकांच्या खिशाला परवडणारी नसल्याने पुन्हा व्यवसाय ठप्प झाला. खरे तर टॅक्सीच्या व्यवसायात असणाऱ्यांना लागणारा खर्चही मोठा आहे. त्यांना ड्रायव्हरच्या वेतनासह वाहनांचे मेंटनन्स, वेगवेगळे कर या सर्व गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने दर वाढवावे लागल्याचे टॅक्सीवाले सांगतात.
- पेट्रोल-डिझेल दर (प्रति लिटर) (रुपयात)
पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१९ ७५.६९ ६६.४१
जानेवारी २०२० ८१.४० ७२.००
जानेवारी २०२१ ९०.८० ८१.०२
ऑगस्ट २०२१ १०७.६२ ९५.८०
- टॅक्सीचे दर
डिझायर - १२ रुपये प्रति किलोमीटर
इनोव्हा - १४ रुपये प्रति किलोमीटर
क्रेस्टा - १५ रुपये प्रति किलोमीटर
१७ सिटर ट्रॅव्हलर - २४ रुपये प्रति किलोमीटर
- कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वच व्यापार अडचणीत आले आहे. टॅक्सी सर्व्हिसवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. अशात वाढत्या डिझेल व पेट्रोलच्या दरामुळे आणखी अडचणी भेडसावत आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे टॅक्सीचे दर वाढले आहे. पण ग्राहक वाढीव दराने सेवा घेण्यास तयार नाही. त्यामुळे टॅक्सी सर्व्हिस चालविणे कठीण झाले आहे. त्यातच गाड्यांचे हप्ते, ड्रायव्हरचा पगार, गाड्यांचे मेंटनन्स, कागदपत्र मेंटेन ठेवण्यासाठी होणारा खर्च यात कुठल्याही प्रकारची सूट मिळाली नाही. आमची इच्छा नसतानाही टॅक्सीच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. ग्राहकांनीही आमचा होत असलेला खर्च समजावा.
फैजान सिराज शेख, संचालक, भारत ट्रॅव्हल पॉईंट