नेत्ररोग विभाग : ‘अॅटोमेटेड पेरीमीटर’, ‘डायओडे लेझर’ उपकरण येणारनागपूर : देशात दरवर्षी तब्बल सहा हजार लोक काचबिंदूमुळे दृष्टी गमावून बसतात. हजारांमधून ८९ जणांना हा आजार अचानक येतो, त्यात ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. या दृष्टिचोर काचबिंदूपासून सावध राहण्यासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाने ‘अॅटोमेटेड पेरीमीटर’ हे उपकरण विकत घेतले आहे. सुमारे ३९ लाखाचे हे उपकरण एप्रिल महिन्यात स्थापन होणार आहे. विशेष म्हणजे, या उपकरणामुळे भविष्यात काचबिंदू होणार की नाही ते कळते. या उपकरणासोबतच ४३ लाखाचे ‘डायओडे लेझर’ हे अत्याधुनिक उपकरणही रुग्णसेवेत असणार आहे.काचिबंदूमध्ये सुरु वातीला फारशी लक्षणे जाणवत नाहीत. किंवा कधी कधी काहीच लक्षणे जाणवत नाहीत आणि कोणतीही पूर्वसूचना न मिळता चोरपावलांनी दृष्टीचा हास होतो. काचबिंदू असणाऱ्या बऱ्याच जणांना आपल्याला काचबिंदू आहे, हे माहितीच नसते. जर काचबिंदूचे निदानच झाले नाही आणि त्यावर उपचारच झाले नाही तर अंधत्व येऊ शकते. त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा आठवडा हा जनजागृती सप्ताह म्हणून पाळला जातो. मेडिकलच्या नेत्रविभागातही या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ३५० वर रुग्ण उपचारासाठी येतात. यातील १० ते १५ रुग्ण हे काचबिंदूशी संबंधित असतात. परंतु आवश्यक उपकरण नसल्याने अनेकेवळा आजाराचे निदान करणे कठीण जात होते. रुग्णाच्या सोयीसाठी सहा महिन्यांपूर्वी विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी ‘अॅटोमेटेड पेरीमीटर’ घेण्याचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी लागलीच याला मान्यता देत जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी निधी मंजूर करून संबंधित उपकरणांची खरेदीही केली. हे उपकरण विदर्भच नाहीतर मेडिकलमध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या चार राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. काचबिंदू होणार की नाही हे आजारापूर्वीच कळणार असल्याने त्यावर उपचार करून आजाराला दूर ठेवून अंधत्व टाळता येणार आहे. या उपकरणामुळे काचबिंदूचे निदान, उपचाराचा प्रभावही कळतो. (प्रतिनिधी)
भविष्यातील काचबिंदूचा धोका आधीच कळणार
By admin | Published: March 12, 2016 3:26 AM