नागपूर : कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेली. २२९७ रुग्ण व १२ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, सलग दोन हजारांवर रुग्णसंख्या गेल्याने आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण नोंदविणाऱ्या सप्टेंबर महिन्यातील रुग्णसंख्या मागे पडून नवा विक्रम स्थापन होण्याची शक्यता आहे. आज ८६६६ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत २६.५० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. मागील पाच दिवसांत १०,७४६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृतांची संख्याही वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७२ हजार ७९९ झाली असून, मृतांची संख्या ४४७१ झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू प्रादुर्भावाला सुरुवात झाली असली तरी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ४५,१९९ नवे रुग्ण आढळून आले होते. यात ६ ते १२ सप्टेंबर दरम्यान ११,९८९ रुग्ण व ३४९ मृत्यू, १३ ते १९ सप्टेंबर दरम्यान १२,४०३ व ३५८ मृत्यू होते. मार्च महिन्यात १ ते ७ या कालावधीत ७९४१ रुग्ण व ५५ मृत्यू, ८ ते १४ दरम्यान १२७७३ व ६९ मृत्यू आहेत. सप्टेंबरच्या तुलनेत या महिन्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत असली तरी मृतांची संख्या फार कमी आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, संसर्ग झपाट्याने पसरत असला तरी गंभीर रुग्णांची संख्या गतवर्षीच्या आणीबाणी काळाच्या तुलनेत फार कमी आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु, मास्कचा वापर, गर्दीची ठिकाणे टाळणे, वारंवार हात धुणे व शारीरिक अंतर पाळणे आवश्यक आहे.
-शहरात १९३३ तर, ग्रामीणमध्ये ३६१ नव्या रुग्णांची भर
नागपूर जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १९३३, ग्रामीणमधील ३६१, तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधील २ तर जिल्हाबाहेरील ३ मृत्यू आहेत. शहरात एकूण रुग्णांची संख्या १३८२५०, तर मृतांची संख्या २८७४ झाली. ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या ३३५६७, तर मृतांची संख्या ७९७वर पोहचली आहे. आज १४०९ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ८७.२८ टक्के आहे.
-१७,५०६ सक्रिय रुग्णांमधून १२,७२८ रुग्ण गृह विलगीकरणात
या महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच सक्रिय रुग्णांच्या संख्येत नवे विक्रम स्थापन होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत १७,५०६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १२,७२८ रुग्ण गृह विलगीकरणात म्हणजे, होम आयसोलेशनमध्ये आहेत. ४७७८ रुग्ण रुग्णालयात आहेत. यात मेडिकलमध्ये २७५, मेयोमध्ये २७५, एम्समध्ये ६०, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ६२, आयसोलेशने हॉस्पिटलमध्ये ११ रुग्ण आहेत. उर्वरीत रुग्ण खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये व मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये आहेत.
- रुग्णसंख्येचा वाढता ग्राफ
१ मार्च : ८७७
३ मार्च : ११५२
५ मार्च : १३९३
७ मार्च : १२७१
९ मार्च : १३३८
११ मार्च : १९७९
१३ मार्च : २२६१
१५ मार्च : २२९७
:: कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या : ८६६६
ए. बाधित रुग्ण :१,७२,७९९
सक्रिय रुग्ण :१७,५०६
बरे झालेले रुग्ण :१५०८२२
ए. मृत्यू : ४,४७१