मेहा शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच दिवसांपेक्षा अधिक ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस होत असल्याचा ब्रिटनचा राष्ट्रीय आरोग्य सेवा समूहाचा संदेश मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. यात म्हटले आहे की, काही रुग्णालयांमध्ये निकृष्ट दर्जाचे पाणी पाईपयुक्त ऑक्सिजनहायड्रेट करण्यासाठी वापरले जाते. यामुळे म्युकरमायकोसिस नाकातून सायनसपर्यंत जाते. याबाबत ‘लोकमत’ने शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला असात, हा आजार होण्याचे हे एक कारण ठरू शकते असा सूर तज्ज्ञांचा होता.
वरिष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले की, म्युकरमायकोसिस होण्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. म्युकरमायकोसिस हा आजार विशेषत: ज्या रुग्णांना ‘इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड’ आहे. म्हणजे, मधुमेह, फुफ्फुसाचा कर्करोग किंवा एड्स आहे त्यांना अधिक प्रमाणात दिसून येत आहे. हा आजार टाळण्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. म्युकरमायकोसिसचे दोन प्रकार आहेत. एक नाकातून डोळे व कानापर्यंत पोहचते तर दुसरा थेट फुफ्फुसात जातो.
लता मंगेशकर हॉस्पिटलचे ईएनटी सर्जन डॉ. नितीन देवस्थळे म्हणाले, कोरोनाच्या रुग्णाला मधुमेह असणे व कोरोनाच्या उपचारात अधिक कालावधीत व अधिक मात्रेत दिलेले स्टिरॉईडमुळे म्युकरमायकोसिस होऊ शकतो. या बुरशीला ओलसर जागा आवडते. रुग्णाच्या ‘ह्युमिडिफायर’द्वारे रुग्णांना ऑक्सिजन दिले जाते. यामध्ये वापरलेले पाणी वारंवार बदलावे लागते. दूषित पाण्यातून ही काळी बुरशी शरीराच्या आत जाऊ शकते. जे रुग्ण ऑक्सिजनवर नाहीत. त्यांनाही हा आजार होऊ शकतो. नाक वाहणे, नाकातून काळे पाणी वाहणे, डोळ्यातून पाणी येणे, चेहरा दुखणे, दात हलणे आदी लक्षणे दिसून येतात. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
ज्येष्ठ चिकित्सक डॉ. पिनांक दंदे म्हणाले, रुग्णाची प्रतिकारशक्ती, मधुमेह, स्टिरॉईडचा वापर, रुग्ण व रुग्णालयाची स्वच्छता आणि ऑक्सिजनसाठी वापरले जाणार ट्यूब, व्हेंटिलेटर आदी म्युकरमायकोसिसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ऑक्सिजन ट्यूब स्वच्छ नसल्याने आणि ‘ह्युमिडिफायर’चे पाणी खराब असल्याने याचा धोका वाढतो. या आजारात ताप, डोकेदुखी, वेदना, त्वचेची जळजळ आदी गंभीर लक्षणे आहेत.