प्रशासनाचा असाही हलगर्जीपणा
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गादरम्यान नागपूर महानगरपालिकेने २५ आपली बस रुग्णवाहिका सुरू केल्या आहेत. मात्र या रुग्णवाहिकांवर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव मात्र धोक्यात आला आहे. त्यांना साधी पीपीई किट किंवा ग्लोव्हज देण्याचे सौजन्यदेखील मनपा प्रशासनाने दाखविलेले नाही. जीव धोक्यात घालून काम करीत असल्याची जाण असतानादेखील कर्मचारी रोजगाराच्या भीतीपोटी काम करीत असल्याचे चित्र आहे.
नागपूर शहरात ८९४ रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत. परंतु दररोज चार ते पाच हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असल्याने, ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची कमतरता भासत होती. ही बाब लक्षात घेता, मनपाने परिवहन विभागाच्या २५ बसेस ‘आपली बस रुग्णवाहिका’ म्हणून देण्याचा निर्णय घेतला. लोकमतने शहरातील विविध भागात उभ्या असलेल्या या रुग्णवाहिकांवर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व पाहणी केली. त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला.
एरवी साध्या रुग्णवाहिकांमधील चालक तसेच सेवा देणारे इतर कर्मचारी पीपीई किटसह सर्व प्रकारची काळजी घेत आहे. अनेकांना रुग्णालयांकडून संबंधित आवश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. मात्र मनपाच्या रुग्णवाहिकांवरील चालक तसेच कंडक्टर्सला मनपा प्रशासनाकडून एन-९५ मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज यांचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. अनेक चालक तर खाकी गणवेश घालून केवळ कापडाचे साधे मास्क लावून कोरोना रुग्णांची ने-आण करीत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात मनपाच्या परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांच्याशी संपर्क केला असता, आरोग्य विभागाकडून पीपीई किट किंवा इतर सुरक्षेची साधने आता प्राप्त झाल्याचे सांगितले. लवकरच त्यांचे चालक व कंडक्टर्स यांना वाटप होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र जर सुरक्षेची साधने मिळाली नव्हती तर मनपाने चालक व कंडक्टर्सचा जीव धोक्यात का टाकला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संसर्गाचा धोका अधिक
सोमवारपासून ही सेवा सुरू झाली. कमी लक्षणे असलेला रुग्ण असेल तर तो स्वतःच रुग्णवाहिकेत मागील दरवाजाने बसतो. मात्र एखादा वयस्कर रुग्ण असेल किंवा तब्येत जास्त खराब असलेला रुग्ण असेल तर आम्हाला मदतीचा हात द्यावाच लागतो. याशिवाय दरवाजा उघडणे-बंद करणेदेखील करावे लागते. अशास्थितीत रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांशी जवळून संपर्क येऊ शकतो व संसर्ग होण्याचा धोका आहे.
वरिष्ठांकडे मागणी केली, पण
यासंदर्भात लोकमतने काही कंडक्टर्स व चालकांशी संवाद साधला. आम्हालादेखील भीती तर वाटतेच. मात्र आम्ही आमचेच मास्क व सॅनिटायझर वापरत आहोत. पीपीई किट किंवा ग्लोव्हज पुरविण्यात यावे, अशी मागणी आम्ही वरिष्ठांना केली. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. आम्ही जास्त आग्रह केला तर नोकरीवरून कमी करण्याची भीती वाटते. कुटुंब पोसायचे आहे, त्यामुळे आम्ही आहे ते काम जास्तीत जास्त काळजी घेऊन करण्याचा प्रयत्न करतो आहे, असा कंडक्टर्स व चालकांचा सूर होता. आमचे नाव छापून येऊ देऊ नका, असे झाले तर नोकरी गेलीच म्हणून समजा, अशी विनंतीदेखील त्यांनी केली.