लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढणे ही अत्यंत समाधानाची व जगात गौरवाची बाब ठरली आहे. मात्र असे असले तरी एक नवीच समस्या निर्माण होत आहे. समूहातील प्रजननाची (इनब्रिडिंग) शक्यता बळावल्याने वाघांची नवी पिढी कमकुवत, आजारग्रस्त होण्याची तसेच आनुवंशिक वैविधता संपण्याची आणि कालांतराने वाघांची एक प्रजातीच नाहीशी होण्याची भीती वाढली आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय व इतर देशातील संशोधकांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॉलुशन’ या आंतरराष्ट्रीय जैवविज्ञान पत्रिकेत हा शोधप्रबंध नुकताच प्रकाशित झाला आहे. अनुभब खान, समीर फळके, अनुप चुगानी, अरुण झकारिया, उदयन बोरठाकूर, अनुराधा रेड्डी, यादवेंद्र झाला, उमा रामक्रिष्णन या भारतीय संशोधकांसह इतर देशातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष मांडला आहे. प्रकाशित झालेल्या या शोधप्रबंधाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी या शोधप्रबंधावर प्रकाश टाकला आहे. पाटील यांच्या मते केवळ वाघ नाही तर इतरही वन्यप्राण्यांचे संचारमार्ग खंडित झाल्याने हा धोका निर्माण झाला आहे. दहा वर्षांत देशातील वाघांची संख्या १४०० वरून २९०० च्यावर गेली म्हणजे दुपटीने वाढली आहे. मात्र याच काळात वाघांच्या अधिवासात मानवाची लाेकसंख्या ५७ टक्क्यांनी वाढली आहे. माणसांचा जंगलात हस्तक्षेप वाढला असून, मानव-वन्यजीव संघर्ष रुद्र रूप धारण करीत आहे. जंगलातून महामार्ग, रेल्वेमार्ग काढले गेले, विकासकामे वाढली. मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे भ्रमणमार्गही खंडित झाले आहेत. एका जंगलातून दुसरीकडे जाणारे भ्रमणमार्ग खंडित झाल्याने वाघांचे वास्तव्य एकाच अधिवासात मर्यादित हाेत आहे. त्यामुळे त्याच अधिवासात राहणाऱ्या आपल्याच कुळातील वाघ-वाघिणीशी ब्रिडिंग हाेण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय वाघांचे आनुवंशिक वैविध्य संपुष्टात येण्याचा धाेका वाढला आहे.
बेंगाल टायगरचे उदाहरण
संशाेधनात बेंगाल टायगरचा आवर्जून उल्लेख केला आहे. बेंगाल टायगर हा वेगवेगळ्या कुळातील वाघांच्या प्रजननातून जन्माला आलेले अतिशय देखणी आणि मजबूत ब्रिड आहे. त्याच्यात सर्वाधिक प्रमाणात आनुवंंशिक वैविध्य आहेत. अभ्यासानुसार पिंजऱ्यात किंवा प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या वाघांच्या नर-मादीचे प्रजनन झाले, तर जन्माला येणारे पिल्ले कमकुवत हाेतात. सिंहाच्या बाबतीतही हे अवलाेकन अभ्यासले गेल्याचे यादव पाटील यांनी सांगितले.
काय हाेतात दुष्परिणाम
- आपल्याच कुळातील वाघांच्या मिलनातून जन्माला आलेल्या बछड्यांचे मागचे पाय अर्धांगवायू झाल्याप्रमाणे कमजाेर असणे. शेपटी गळून पडणे.
- जनुकीय आनुवंशिक वैविध्य नाहीसे हाेणे.
- कमजाेर ब्रिड तयार झाल्याने शिकारीच्या मूळ स्वभावावर परिणाम हाेण्याची शक्यता.
- कालांतराने सध्या अस्तित्वात असलेली प्रजाती नाहीशी हाेण्याचीही शक्यता.
माणसांमध्ये एका कुळात सहसा लग्न हाेत नाही, त्याचप्रमाणे प्राण्यांचेही हाेऊ नये. वाघांचे इनब्रिडिंग झाले तर जेनेटिक डिफेक्ट येण्याची शक्यता असते. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असण्याची शक्यता. काेणतेही आजाराचे बळी पडण्याची शक्यता आहे. काही बछड्यांना मेंटल डिफेक्ट, बहिरेपणा, आंधळेपणा, जन्मत:च मृत्यूचा धाेका. पाठीच्या कण्यामध्ये डिफेक्टची शक्यता. जन्मत: पांढरेपणा येण्याची शक्यता असते.
- डाॅ. हेमंत जैन, वेटनरी सर्जन
वाघांचे अस्तित्व व्याघ्र प्रकल्पापुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या प्रजननासाठी संचार मार्ग सुरक्षित असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्या राज्यात संचार मार्गांची दुरवस्था आहे. भविष्यात हा वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री यांनी नवीन अभयारण्य व संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करून सुरवात केली आहे. मात्र व्यवस्थापन गंभीर्याने होणे आवश्यक आहे.
- यादव तरटे पाटील
सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ
राज्यात ६ व्याघ्र प्रकल्प
भारतात ५०
राज्यात ५० अभयारण्ये
भारतात अंदाजे ७००
वाघांची संख्या राज्यात ३१६
भारतात २९९५