योगेश पांडेनागपूर : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज कारने रामझुला पुलावर दोन निष्पाप तरुणांना चिरडल्याचा आरोप असलेल्या धनाढ्य व्यावसायिक रितिका ऊर्फ रितू दिनेश मालू (३९) हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास तिला अटक केली. रितिकाचा जामीन सत्र न्यायालयाने बुधवारी रद्द केला होता व तिला अटक करण्याची परवानगी दिली होती.
तहसील पोलिसांनी मालूविरोधात २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भादंवि कलम २७९ (निष्काळजीपणाने वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) या अदखलपात्र गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने मालूला त्याच दिवशी जामीन दिला होता. दरम्यान, तिच्या रक्तामध्ये अल्कोहोल आढळून आल्यामुळे पोलिसांनी २ मार्च रोजी एफआयआरमध्ये भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) व मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या दखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला. परंतु, त्यानंतर पोलिसांना तीनवेळा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडून मालूला अटक करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
हा अर्ज प्रलंबित असताना गेल्या ३० ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तहसील पोलिसांचा हलगर्जीपणा लक्षात घेता या अपघाताचा तपास राज्य 'सीआयडी'कडे हस्तांतरित केला. परिणामी, सत्र न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या विनंतीवरून या अर्जामधून तहसील पोलिसांना वगळण्याची व त्यात 'सीआयडी'चा समावेश करण्याची परवानगी दिली. रात्री दीड वाजताच्या सुमारास सीआयडीचे पथक मालूच्या वर्धमाननगर परिसरातील निवासस्थानी गेले व तेथून तिला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीने ही कारवाई करण्यात आली. तिला रात्री सिताबर्डी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. तेथून सीआयडीचे पथक तिला चौकशीसाठी घेऊन जाईल. गुरुवारी तिची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.