श्रेयस हाेले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागनदी, पिवळी नदी आणि पाेहरा नदी या नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांची प्रदूषणाची स्थिती इतकी दयनीय आहे की त्या नागरिकांनी पिण्याचे पाणीही देऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात नागनदी पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जात आहेत पण त्यात हवे तसे यश मिळाले नाही. पिवळी व पाेहरा नदीसाठी अशाप्रकारचे फारसे प्रयत्न झाले नाही. मात्र पारंपरिक पद्धतीने नद्या स्वच्छ हाेणार नाहीत, त्यासाठी अधिक वैज्ञानिक दृष्टिकाेन ठेवून काम करावे लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
इकाेसिटी फाऊंडेशनचे संचालक पर्यावरण अभ्यासक प्रद्युम्न सहस्रभाेजनी यांनी लाेकमतशी बाेलताना यावर सविस्तर प्रकाश टाकला. नागपूरच्या नद्या कधीपासून, कशा आणि का प्रदूषित झाल्या, ही बाब समजावी लागेल. कारण प्रदूषण हे त्यांच्यापुरते मर्यादित राहत नाही तर प्रवाहाबराेबर ते पाण्याच्या दुसऱ्या स्रोतात जाऊन मिसळते. त्यामुळे हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. शहरातून वाहणाऱ्या नागनदीमुळे या भागातील कन्हान आणि पुढे वैनगंगासारखी माेठी नदीही प्रदूषित हाेत आहे. यावर गंभीरतेने लक्ष दिले नाही तर पुढे वेणा आणि वर्धा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडेल कारण शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. सहस्रभाेजनी यांच्या मते, नागनदीला पारंपरिक पद्धतीने पुनरुज्जीवित करणे शक्य नाही. यापूर्वीही शुद्धीकरणाचे बरेच प्रयत्न झाले पण परिणाम काही झाले नाही. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकाेनातून यावर उपाय शाेधून त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. वरवर शुद्धीकरणाचे प्रयत्न केल्याने नदी शुद्ध हाेणार नाही. त्याऐवजी घरातून निघणारे सिवेज त्याच्या स्रोतांमधून शुद्ध केले तर नदी आपाेआप शुद्ध हाेईल.
ही गाेष्ट तीन टप्प्यात करता येईल. प्राथमिक टप्प्यात सांडपाण्याचे आपल्या घराच्या स्तरावर शुद्धीकरण हाेणे गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यात वस्तीनुसार ॲनएराेबिक फिल्टर लावावे लागेल. तिसऱ्या टप्प्यात नद्यांच्या किनाऱ्यावर ग्रीन बेड तयार करावे लागेल. तंत्राला ‘डिसेंट्रलाइज वेस्टवाॅटर ट्रीटमेंट सिस्टिम’ (डिवॅट्स) असे संबाेधले आहे. सांडपाणी शुद्धीकरणाने या प्रक्रियेतील गुंतागुंत दूर करता येइल आणि पाण्यातील पीएच स्तरही नियंत्रणात ठेवता येइल. सांडपाण्याचे रिसायकल आणि रियुज करण्याला प्राथमिकता देण्याची गरज आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांवरील भार कमी हाेइल. नद्या स्वच्छ झाल्या तर भविष्यात शहर आपाेआप सुंदर हाेईल, असा विश्वास सहस्रभाेजनी यांनी व्यक्त केला.