लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार असून रखडलेल्या प्रकल्पांना लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. सोबतच ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरीनितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गडकरी यांनीच यासंदर्भात सूचना दिल्या.या बैठकीला ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते. बैठकीत नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, नागपूर-उमरेड, वणी-वरोरा या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील रखडलेले रस्ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सोबतच प्रस्तावित मार्गांच्या कामालादेखील गती देण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे निर्देश गडकरी यांनी प्रशासनाला दिले. नागपूर- भंडारा, नागपूर-काटोल, सावनेर- धापेवाडा, नागपूर-भंडारा-रामटेक-तुमसर तसेच राज्यांतील ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात त्या शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत हे मार्ग बांधावे, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय महामार्ग हे शहराच्या सीमेपर्यंत बांधण्यात येत असत व पुढे त्याचे काम महापालिकांकडे सोपविण्यात येत असे. पण आता शहराच्या मध्यभागापर्यंत हे मार्ग बांधण्यात येणार आहेत. यामुळे लहान शहरांचादेखील वेगाने विकास होण्यास मदत होणार आहे. सोबतच बैठकीमध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ टोल नाका, जालना जिल्ह्यातील चिखली, नाशिक- पुणे महामार्गावरील पाच बायपास तसेच टोल नाके आणि मुंबई- गोवा महामार्ग यासारख्या एकूण २४ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.रामटेककडे जाणाऱ्यांना दिलासारामटेक ही पवित्र नगरी म्हणून ओळखली जाते व येथे विविध धर्मांची प्रार्थना व श्रद्धास्थळे आहेत. येथे येणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील मनसर टोल नाका हा नागपूर महानगर विकास प्राधिकरणातून वगळण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. हा टोल नाका आता खवासा सीमेकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे रामटेक येथे दर्शनासाठी जाणारे भविक तसेच स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच पाटणसावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे हलविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.