देखाव्यापुरती महापालिकेची कारवाई : रस्ता अरुंद असल्यामुळे लागतोय जाम
नागपूर : मध्य नागपुरातील मोमिनपुरा मार्केटमध्ये अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यापर्यंत स्थानिक दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे येथे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. सायंकाळ होताच येथे वाहतूक विस्कळीत होते. परंतु नागपूर महानगरपालिका देखाव्यापुरती कारवाई करीत आहे. चार ते पाच महिन्यात एकदा कारवाई करण्यात येत असल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. बाजार परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीसही गंभीर नाहीत. येथे एकही वाहतुक पोलिसाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. अतिक्रमणामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु प्रशासन मूकदर्शक होऊन ही समस्या पाहत आहे. मोमिनपुरा प्रवेशद्वारापासून इस्लामिया स्कुल, बोरियापुरापासून किदवई रोड, टिमकीपर्यंत अतिक्रमण करण्यात आले आहे.
...........
पाहताच निर्माण होतो वाद
मोमिनपुऱ्यात रस्त्यापर्यंत दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. पार्किंगची वेगळी व्यवस्था नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात. परंतु दुकानदार वाहनेही ठेवू देत नाहीत. यामुळे येथे नेहमीच वाद निर्माण होत आहेत. दुकानासमोर वाहन घेऊन उभे राहणेही कठीण होत आहे.
मो. अली सराय फूटपाथ गायब
मोमिनपुरा येथे मो. अली सराय परिसरात एका रांगेने दुकाने आहेत. येथे प्रशासनाच्या वतीने रस्त्याला लागून फूटपाथ तयार करण्यात आले आहे. परंतु फूटपाथही आता दुकानात रुपांतरित झाले आहे. एवढेच नव्हे तर फूटपाथनंतर दुकानदारांनी रस्त्यावरही ताबा मिळविला आहे. यामुळे येथे वाहने उभी करणेही कठीण झाले आहे. सरायच्या समोर आचानक मनमानी पद्धतीने ऑटो उभे करीत असून त्यांनी स्वयंघोषित ऑटो स्टँड तयार केले आहे. यामुळे समस्येत वाढ होत आहे.
टिमकी मार्गावर ऑटोचालकांची मनमानी
किदवाई मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. इस्लामिया स्कूल चौकापासून गोळीबार चौकापर्यंत जाणाऱ्या आणि टिमकीपर्यंत दोन्ही बाजूने अतिक्रमण करण्यात आले आहे. याच मार्गावर कब्रस्तान गेटपासून टिमकीपर्यंत ऑटोचालकांमुळे अडचणी येत आहेत. रस्त्यावर ऑटो उभे करण्यात येत असल्यामुळे येथे वाहतूक विस्कळीत होत आहे.
हॉटेलची पार्किंग रस्त्यापर्यंत
मोमिनपुरा परिसरात हॉटेलमध्ये येणारे ग्राहक रस्त्यापर्यंत आपली वाहने उभी करतात. अनेक हॉटेलसमोर ये-जा करण्यासाठी वाहनांना जागा दिल्या जात नाही. मनमानी पद्धतीने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक विस्कळीत होते.
व्यवस्थेबाबत गंभीर नाही प्रशासन
मोमिनपुरा हा बाजाराचा परिसर आहे. येथे बाहेरून नागरिक खरेदीसाठी येतात. परंतु येथे नागरिकांना कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. या परिसरात पार्किंगचीही सुविधा नाही. फूटपाथवर ठेला लावणाऱ्या दुकानदारांकडेही लक्ष पुरविण्यात येत नाही. महिला गल्लीत महिला पोलिसही तैनात करण्यात आली नाही. वाहतुक पोलीस येथे कार्यरत नाही. यामुळे महापालिका प्रशासन आणि लोक प्रतिनिधी मोमिनपुरा येथील व्यवस्थेबाबत गंभीर नसल्याची स्थिती आहे. प्रशासन आणि लोक प्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष पुरविल्यास हा परिसर मोठा आर्थिक हब होऊ शकतो.
प्रशासनाने कारवाई करावी
‘मोमिनपुरा परिसरात अतिक्रमण ही फार मोठी समस्या झाली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. तीन चार महिन्यातून एकदा कारवाई होत असल्यामुळे काहीच फायदा होत नाही. सोबतच फूटपाथवरील ठेले, दुकानदारांना जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’
-जुल्फेकार अहमद भुट्टो, नगरसेवक
..............