नागपूर : कोरोनामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. अनेक रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. उत्तर नागपुरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. प्रभाग ६ अंतर्गत येणाऱ्या यशोदीप कॉलनी, महेंद्रनगरच्या रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. परिसरातील एनआयटी ईडब्ल्यूएस क्वाॅर्टर आणि यशोदीप कॉलनीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
परिसरातील नागरिकांनी रस्त्याची डागडुजी करण्यासाठी महापालिकेला जुलै २०२०, डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये ऑनलाइन तक्रार केली. परंतु रस्त्याची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले नाहीत. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झोन स्तरावर तक्रार करण्यात आली. परंतु अधिकारी नुसतेच येऊन निघून गेले. अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे विकासकामे ठप्प झाल्याची माहिती दिली. समाजसेवक व परिसरातील नागरिक जावेद इकबाल यांनी सांगितले की, रस्त्यांची अवस्था खराब झाल्यामुळे अपघात वाढत आहेत. आम्ही तीन वेळा ऑनलाइन तक्रार केली. परंतु तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. परिसरात सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी फाइल तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. तीन ते चार वर्षांपासून रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. सुभाष सरोदे यांनी सांगितले की, महापालिका आपली जबाबदारी टाळू शकत नाही. नागरिक आपल्या समस्या दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींना मत देतात, टॅक्स भरतात. परंतु त्यांना आपल्या समस्या दूर करण्यासाठी हेलपाटे खावे लागतात. परिसरातील रस्त्यांची त्वरित डागडुजी करण्याची मागणी त्यांनी केली.
...........
डुकरांचा उपद्रव
परिसरात डुकरांचा उपद्रव वाढला आहे. दिवस-रात्र ते परिसरात फिरताना दिसतात. नागरिकांच्या घरासमोरील झाडांची मुळे कमकुवत करण्यापासून तर घाण पसरविण्याचे काम करतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीही प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही.
............