लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेत नागपूर शहर अव्वल यावे यासाठी महापालिका प्रशासनाने जोर लावला आहे. घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. १६ नोव्हेंबर पासून दोन कंपन्या ही जबाबदारी सांभाळणार आहे. शहरातील सर्व भागातील कचरा उचलला जावा, यासाठी ४७२ वाहने लावली जाणार आहे. या वाहनांचे ‘रोड मॅप’ निश्चित करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी बैठकीत दिले.यावेळी आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह सहायक आयुक्त, झोनचे कार्यकारी अभियंता, आरोग्य निरीक्षक, उपद्रव शोध पथकाचे अधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत कर्मचारी व अधिकारी व्यस्त असल्याने स्वच्छतेसंदर्भात महिनाभरात बैठक झाली नव्हती. स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी तसेच नागपूर शहराला ओडीएफ प्लस-प्लस नामांकन प्राप्त व्हावे, यादृष्टीने आयुक्तांनी स्वच्छतेचा आढावा घेऊ न अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.कचरा संकलनासाठी दोन कंपन्याकचरा संकलनासाठी शहराचे दोन पॅकेजमध्ये विभाजन केले आहे. यात झोन एक ते पाच पॅकेज-१ मध्ये तर सहा ते दहा झोनचा पॅकेज -२ मध्ये समावेश आहे.घरातून व बाजार भागातील कचरा संकलित करण्याच्या नवीन व्यवस्थेवर प्रशासन काम करीत आहे. यासाठी यात ए. जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. ठाणे व बीवीजी इंडिया लिमिटेड, पुणे या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही कंपन्यांना ४७२ वाहने, १५०० हून अधिक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा उभारावयाच्या आहे. याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.शौचालयांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्षनागपूरला उघड्यावरील शौच मुक्त (ओडीएफ) शहर घोषित करण्यात आले. त्यानंतरही स्वच्छ भारत अभियानांतर्गत उघड्यावर शौचातून मुक्ती होण्याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. यावेळी प्रथमच ओडीएफ प्लस-प्लसचा पर्याय ठेवण्यात आला आहे. महापालिकेने स्वत:शहराला ओडीएफ प्लस श्रेणीत दर्शविले आहे. श्रेणीत सुधारणा व्हावी, यासाठी सार्वजनिक व सामुहिक शौचालयांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासाठी १४० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी झोनल अधिकाºयांकडे देण्यात आली आहे. याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.