लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन शिथिल होताच रस्त्यावर, दुकानात, कार्यालयांमध्ये वर्दळ वाढली आहे. यामुळे आरोग्य विभागावरील जबाबदारी वाढली आहे. दुसरीकडे नागपुरात रुग्ण संख्येचा उच्चांक गाठल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला, सिग्नलवर स्वस्तात मास्क, ग्लोव्हज व सॅनिटाझरची विक्री होताना दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधाला या गोष्टी किती योग्यतेच्या आहेत, या विषयी सावधानता बाळगून अशा उत्पादनांच्या वापर टाळायला हवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.रस्त्याच्या कडेला, चौकात, हातठेल्यांवर १० ते २० रुपयांत मास्क, सॅनिटायझर विक्री होताना दिसून येत आहे. या विक्रीसाठी वापरण्यात येणारे मास्क व सॅनिटायझर वापरून पुन्हा त्याची विक्री करत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यामुळे नागपूरकरांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. रस्त्यावर उघड्यावर विकण्यात येणारे मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर खरेदी करू नये असा सल्ला मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी दिला आहे. बऱ्याच ठिकाणी फॅ न्सी मास्क पाहून विक्रेत्यांभोवती नागरिक गर्दी करतात. विशेष म्हणजे, काही नागरिक चेहऱ्यावर मास्क लावूनही पाहतात. कोणता सूट होतो, हे पाहून फॅ न्सी मास्क खरेदी करतात; मात्र हे धोकादायक ठरू शकते. कोरोना विकत घेण्यासारखा हा प्रकार असल्याने नागरिकांनी पॅकबंद मास्क खरेदी करायला हवेत किंवा घरी तयार केलेला मास्क वापरायला हवा. दर्जाहीन किंवा वापरून पुन्हा विक्री होत असलेल्या या उत्पादनांच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. यामुळे या उत्पादनांची अशा स्वरूपाची खरेदी टाळायला हवी. या खेरीज बाहेर पडताना संवेदनशील गटात असणारी लहान मुले, गर्भवती, ज्येष्ठ नागरिक या व्यक्तींची अधिक काळजी घ्यायला हवी, असेही डॉ. पांडे म्हणाले.
नियमावली करणे आवश्यकरस्त्यावर विक्री करणारे विक्रेते हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. मास्क खरेदीने त्यांना दोन पैशांची मदत होणार आहे; मात्र मास्क उघड्यावर विकण्याऐवजी ते पॅकबंद असतील, यासाठी नियमावली करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये विक्रेत्यांच्याही रोजगाराचा प्रश्न सुटेल, महानगरपालिकेने यात पुढाकार घेणे आवश्यक आहे.