मौजा नारी येथील ५०० घरकुलधारक त्रस्त : तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेद्वारे घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे चार वर्षांपूर्वी निवासी संकुल उभारण्यात आले. उत्तर नागपुरातील रेल्वेलाईन येथील झोपडपट्टीधारकांचे येथे पुनर्वसन करण्यात आले; परंतु ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. पिण्याचे पाणी, गटार लाईन, पथदिवे अशा सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत; यामुळे येथील हजारांहून अधिक रहिवाशांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.
घरकुल योजनेसाठी २४ मीटर आणि १८ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर आहे; परंतु महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. महापालिकेतील पदाधिकारी पाहणी करतात, आश्वासन देतात; परंतु पुढे काहीच होत नाही, अशी व्यथा येथील नागरिकांनी मांडली.
या संकुलामध्ये मल्टिपर्पज हॉल, शाळा, आरोग्य केंद्र, ११ दुकाने, खेळांचे मैदान, बगीचा, आदी सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. परंतु या सुविधा तर दूरच; अजूनही सिव्हरेज लाईन टाकलेली नाही. पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे महिला व मुलांना रात्री घराबाहेर पडता येत नाही.
घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे ५४४ सदनिका उभारण्यात आलेल्या आहे. यांतील ४१४ सदनिकांत झोपडपट्टीधारक वास्तव्यास आहेत. यात प्रामुख्याने मजूर आहेत. कामासाठी त्यांना जावे लागते. पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागते.
.....
नगरसेवकांनी दिले आयुक्तांना पत्र
‘एसआरए’अंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलधारकांना रस्ता, पाणी, गटार लाईन, पथदिवे, आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे. आजवर पालकमंत्री, महापालिका अधिकारी, नासुप्र अधिकारी यांना आठ ते दहा वेळा निवेदन दिले; परंतु नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.
.....
रस्त्याच्या प्रस्तावित जागेवर भूखंड
घरकुल योजनेचा प्रस्तावित रस्ता हा काही खासगी शेतातून जातो. जमीनमालकांनी या जागेवर लेआऊट टाकून भूखंड विकले. यामुळे या रस्त्याला विरोध होत आहे. प्रकल्प राबवितानाच रस्त्याचे काम करणे गरजेचे होते; परंतु घरकुल योजना उभारल्यानंतर प्रशासनाला याची जाग आली. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
....
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
घरकुल योजनेसाठी चांगला रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर चिखल होत असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करता येत नाही. अन्य सुविधांचाही अभाव असल्याने येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.