प्रशासन कधी होईल कर्तव्यदक्ष : हायकोर्टाच्या आदेशानंतरही समस्या कायमनागपूर : खासगी रुग्णालये, मंगल कार्यालये, हॉटेल्स, कॉर्पोरेट आॅफिसेस इत्यादी इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे येथे जाणाऱ्या नागरिकांना नाईलाजास्तव रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १५ आॅक्टोबर २०१५ रोजी पार्किंगच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु, प्रशासनाने या आदेशाला गंभीरतेने घेतलेले नाही. अनेक इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम अद्यापही कायम आहे. अशा इमारती शहरभर पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या इमारती संपूर्ण शहरभर आहेत. कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक इमारतीमध्ये पार्किंगसाठी जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे. इमारतींचे आराखडे मंजूर करून घेताना पार्किंगसाठी राखीव जागा दाखविल्या गेली आहे. त्यानुसार इमारतीही बांधण्यात आल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात पार्किंगची जागा स्वागतकक्ष, चौकशी कक्ष, रुग्ण नोंदणी कक्ष, बैठक कक्ष अशा विविध अन्य बाबींसाठी उपयोगात आणली जात आहे. अनेक रुग्णालयांमधील पार्किंगची जागा रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी वापरण्यात येत आहे. तसेच, पार्किंगसाठी वाचवून ठेवलेल्या थोड्याफार जागेवर कर्मचाऱ्यांची वाहने उभी ठेवली जातात. यामुळे नागरिकांना रोडवर वाहने उभी ठेवावी लागतात. अवैध पार्किंगमुळे अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूने एकाचवेळी वाहने पुढे काढता येत नाहीत. स्थानिक रहिवासी व अन्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवैध पार्किंगमुळे अनेकदा प्राणघातक अपघात घडले आहेत. या ठिकाणी गंभीर समस्याधंतोली, रामदासपेठ, सीताबर्डी, महाल, सदर, धरमपेठ, सक्करदरा, मेडिकल चौक परिसर, गणेशपेठ, कॉटन मार्केट, इतवारी, गांधीबाग, पाचपावली व मोमीनपुरा भागात पार्किंगची गंभीर समस्या आहे. ही समस्या पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे निर्माण झाली आहे. या भागातील हॉटेल्स, रुग्णालये, शॉपिंग मॉल्स, कपड्यांसह विविध वस्तूंची दुकाने, बार इत्यादी इमारतींमध्ये पार्किंगसाठी आवश्यक जागाच उपलब्ध ठेवण्यात आलेली नाही. यामुळे ग्राहकांपुढे रोडवर वाहने उभी ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वाहतूक पोलीस अशा अवैध पार्किंगवर कारवाई करीत असल्यामुळे शेवटी सामान्य व्यक्तीलाच त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या ज्यांच्यामुळे निर्माण झाली ते मात्र कोणत्याही भीतीशिवाय व्यवसाय करीत आहेत. प्रशासनाची कर्तव्यदक्षता प्रामाणिक नसल्याचे यावरून सिद्ध होते.धंतोलीतून झाली सुरुवातयाप्रकरणाची धंतोलीतून सुरुवात झाली. धंतोलीमध्ये गल्लोगल्ली रुग्णालये उघडण्यात आली आहेत. साध्या तापापासून ते कर्करोग, हृदयरोग, मेंदू व मूत्रपिंडाचे आजार इत्यादी सर्वप्रकारच्या मानवी व्याधींवर उपचार करणारी रुग्णालये धंतोलीत आहेत. गेल्या काही वर्षांत नामांकित डॉक्टरांनी धंतोलीकडे मोर्चा वळविल्यामुळे जास्तीतजास्त रुग्णांना या भागात उपचारासाठी भरती केले जाते. परंतु, मोठमोठ्या इमारती असल्या तरी अनेक रुग्णालयांच्या संचालकांनी पार्किंगसंदर्भातील नियम धाब्यावर बसविले आहेत. याविरुद्ध धंतोली नागरिक मंडळाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान हा प्रश्न केवळ धंतोलीशी संबंधित नसल्याची बाब लक्षात आल्यामुळे न्यायालयाने व्यापक भूमिका घेऊन संपूर्ण शहरातील पार्किंगच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत.
अनधिकृत बांधकामामुळे रोडवर पार्किंग
By admin | Published: May 16, 2016 3:12 AM