सावरगाव : जिल्ह्यात गत दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. अशात नरखेड तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गुरुवारी भर पावसात सिमेंट रोडचे काम करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. यामुळे हा रस्ता किती दिवस असा प्रश्न ग्रामस्थांच्यावतीने विचारला जात आहे. जिल्हा वार्षिक नियोजन फंडातून (डी.पी.डी.सी.) हा सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. परिसरात गुरुवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काम थांबायला पाहिजे होते. मात्र तसे न होता भर पावसात कंत्राटदारदाराकडून काम करण्यात आले. सरपंच यांच्या घराला लागूनच हा रस्ता आहे. त्यामुळे सरपंचांनाही हे लक्षात आले नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे या कामाची गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाऊस सुरू झाल्यावर मी स्वतः कामावर जाऊन सिमेंट रोडचे काम बंद करण्यास सांगितले.
- रमेश बन्नगरे
सचिव ग्राम पंचायत, सावरगाव
--
जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पाऊस येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. तरी सुद्धा ग्रामपंचायतीकडून रस्त्याचे काम करण्यात आले. हा शासकीय निधीचा दुरुपयोग नाही का?
राकेश बोदड, नागरिक