लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग वाढू नये यासाठी परिसर प्रशासनाकडून सील केला जातो. नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत आहे. परंतु ज्या वस्त्यांमध्ये वा परिसरात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा अनेक वस्त्यांमधील रस्ते गेल्या एक-दीड महिन्यापासून बंद करण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच फेरीवाल्यांना त्रास सहन करावा लागत आहे.कोरोनाच्या भीतीमुळे काही वस्त्यांतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे रस्ते बंद केले. १४-१५ दिवसांनंतर ते खुले केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र विनाकारण रस्ते बंद करण्यात आले आहेत. मनपा आयुक्तांनी १४ मे रोजी लॉकडाऊनमध्ये शिथिलता घोषित केल्यानंतरही रस्ते खुले केलेले नाहीत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.असे रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वा आजारी व्यक्तीला वाहनाने रुग्णालयात न्यावयाचे झाल्यास फेऱ्याने जावे लागते. तसेच रस्ते बंद केल्याने नागरिकांच्या मनात विनाकारण भीती निर्माण झाली आहे.शहरातील मोमिनपुरा, डोबीनगर, सतरंजीपुरा, गड्डीगोदाम, जवाहर नगर, टिमकी, पार्वतीनगर, हंसापुरी, शांतिनगर, जरीपटका आदी ३६ वस्त्यांमध्ये बाधित रुग्ण आढळून आले. यातील अनेक वस्त्यांमध्ये एक वा दोन रुग्ण आढळून आले होते. कोरोनाचे रुग्ण आढळल्याने त्या भागांना प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहे. यातील अनेक वस्त्यांतील रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने प्रतिबंध हटविण्यात आले.शिथिलता दिल्यानंतरही रस्ते बंदमहापालिका आयुक्तांनी शहरात काही व्यवहारांना परवानगी दिली आहे. या परिस्थितीत लोकाना आता नोकरी व इतर व्यवहारांसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. बाधित क्षेत्र वगळता शहरातील इतर भागात व्यवहार खुले झाले असतानाही काही नागरिकांनी आपापल्या वस्त्यांमधील रस्ते जाणीवपूर्वक बंद ठेवले आहेत. यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
प्रतिबंधित क्षेत्र नसतानाही नागपुरात अनेक वस्त्यांचे रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 8:28 PM