लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे आकडे वाढत आहेत व या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे शनिवार व रविवार लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले होते. रविवार सुटीचा दिवस असल्याने दुपारपर्यंत नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र सायंकाळनंतर शहरातील काही भागात लोक बाहेर पडल्याचे दिसून आले. दिवसभर शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठा बंद होत्या.
नागपुरात वाढत्या कोराेनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार या दोन दिवशी बंद पाळण्याचे आवाहन केले होते अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयांसह विविध आस्थापने व दुकाने आदी सर्व बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. हा लॉकडाऊन नसून नागरिकांनीच स्वत:हून आपली जबाबदारी समजून हा बंद पार पाडावयाचा आहे. यासाठी राज्य सरकारने ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला नागरिकांनी आज रविवारी दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद राहिल्या. दुकाने बंद होती. रस्ते ओस पडले होते.
रविवारी सुद्धा शनिवारप्रमाणेच वातावरण होते. किंबहुना रविवारी गर्दी शनिवारपेक्षा कमीच दिसून आली. शहरातील बर्डी, महाल, गांधीबाग, सदर, गोकुळपेठ, सक्करदरा आदी मुख्य बाजारपेठा रविवारी हाउसफुल्ल असतात. पाय ठेवायलाही जागा नसते. रविवारी हे सर्व मार्केट ओस पडले होते. अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडली तर सर्व बंद होते. पोलीस रस्त्यावर उतरले होते. मात्र नागरिकांना मात्र कुठलीही सक्ती केली जात नव्हती.
महाराजबाग सामसूम
रविवार म्हटला तर बच्चे कंपनीसोबतच मोठेही फिरायला बाहेर पडतात. महाराजबाग हे शहरवासीयांसाठी एक छोटेखानी पिकनीच स्थळच. त्यामुळे रविवारी येथे मोठी गर्दी असते. यामुळे महाराजबाग परिसर गर्दीने व्यापलेला असतो. परंतु रविवारी महाराजबाग बंद असल्याने वेगळेच चित्र दिसून आले. तेथे अगदीच सामसूम होते. केवळ महाराजबागच नव्हे तर शहरातील फुटाळा तलाव, बालोद्यान, अंबाझरी आदी ठिकाणेही बंद असल्याने ओस पडली होती.