नागपूर : विकासाच्या नावाखाली करण्यात येत असलेल्या वृक्षतोडींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून प्रदुषणाचा स्तरही तितकाच झपाट्याने उंचावतो आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी वृक्षारोपण प्रकल्प हाती घेण्यात येतात. मात्र, हे वृक्षारोपणाकडे विशेष असे लक्ष दिले जात नसल्याचे दिसते.
नागपूर शहरातील प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा ११ हजार झाडे लावण्याकरता महानगरपालिकेने ४ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्यादेश काढला. या अंतर्गत 'नीरी'च्या मागच्या रस्त्यावर फक्त ४५० झाडे लावण्यात आली. त्यानंतर, मात्र हे कामच बंद पडले. तर, दुसरीकडे विकासाच्या नावावर शहरातील अनेक झाडे तोडण्यात आली.
महपालिकेने पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी वृक्षारोपणाचे काम हाती घेतले. यासाठी ११ हजार २६० झाडे लावण्यासाठी ४ कोटी ९७ लाख ३ हजार २७५ रुपयांचे कंत्राट रेनबो ग्रीनर्स या संस्थेला देण्यात आले. त्याअंतर्गत वृक्षरोपणाला सुरुवातही झाली. सेल्फ वॉटरिंग सिर्टीम तंत्रज्ञानाद्वारे हे वृक्षारोपण हाती घेण्यात आले होते. मात्र, हळू-हळू महापालिकेला या कामाचा विसरच पडल्याचे चित्र आहे.
वृक्षरोपणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महापालिकेला वारंवार सूचना दिल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसून नसल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. दोन वर्ष उलटुनही काम अद्याप सुरू झाले नसल्याने वृक्षरोपणासाठीचा निधी आलाच नाही का? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे.