लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहराच्या मध्य भागातून गेलेल्या नागपूर-कळमेश्वर-काटाेल मार्गालगत राेज सकाळी माेठ्या प्रमाणात भाजीपाल्याची दुकाने थाटली जातात. हा मार्ग वर्दळीचा असल्याने तसेच दुकानांसमाेर ग्राहकांची गर्दी हाेत असल्याने रहदारीस हाेणारा अडसर अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे ही दुकाने नगरपालिकेच्या भाजीपाला मार्केटमध्ये स्थानांतरित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राज्य शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जमाव व संचारबंदी लागू केली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने कळमेश्वर शहरात भाजीपाला विक्रेते त्यांची दुकाने नागपूर-कळमेश्वर-काटाेल मार्गालगत असलेल्या नगर परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संरक्षण भिंतीला लागून थाटतात. या दुकानांसमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे मुळीच पालन केले जात नाही. कुणाचाही अंकुश नसल्याने नागरिक गर्दी करतात. याच ठिकाणी नागरिक राेडलगत त्यांची वाहने अस्ताव्यस्त उभी ठेवतात. त्यामुळे ही गर्दी अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नगर परिषद प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांसाठी भाजीपाला मार्केटमधील माेकळ्या जागेवर दुकानांच्या जागेची व्यवस्थित आखणी करून दिली आहे. मात्र, भाजीपाला विक्रेते तिथे न बसता शाळेजवळील तळ्याच्या पारीलगत बसतात. शहरातील संत्रा मार्केट व कोलबास्वामी स्टेडियम येथील माेकळ्या जागेवर भाजीपाला बाजार सुरू केल्यास फिजिकल डिस्टन्सिंगसाेबतच वाहन पार्किंगची समस्याही मार्गी लागू शकते. त्यामुळे संभाव्य धाेका टाळण्यासाठी ही समस्या साेडविण्याची मागणी केली जात आहे.
....
टी-पाॅईंट धाेकादायक
ही भाजीपाल्याची दुकाने ज्या ठिकाणी थाटली जातात, त्या ठिकाणी गाेंडखैरी मार्ग नागपूर-कळमेश्वर-काटाेल मार्गाला जाेडला असल्याने टी-पाॅईंट तयार झाला आहे. या दाेन्ही मार्गावरून जड वाहतूक सुरू असते. शिवाय, गाेंडखैरीहून येणारी वाहने डावीकडे किंवा उजवीकडे वळण घेत असल्यााने तसेच समाेर व बाजूला भाजीपाल्याची दुकाने व समाेर गर्दी राहत असल्याने तिथे अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...
या भाजीपाला विक्रेत्यांना त्यांच्यासाठी राखीव केलेल्या जागेवर दुकाने थाटण्याची दाेनदा सूचना देेण्यात आली आहे. परंतु, ते ऐकायला तयार नाहीत. हा प्रकार पुढेही सुरू राहिल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- स्मिता काळे, मुख्याधिकारी,
नगर परिषद कळमेश्वर-ब्राह्मणी.