लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला होत असलेल्या दीडशेव्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जुळून आलेला हा योग निश्चितच कलावंतांच्या मनाला उभारी देणारा असून, शहरात कार्यरत असलेल्या विविध नाट्यसंस्था व रंगकर्मींना चेतना देणारा आहे.महाराष्ट्र ही नाट्यनिर्मितीची भूमी आणि महाराष्ट्राचे नाट्यवेड अवघ्या भारतीयांना माहीत आहे. येथील नाटकांची भुरळ परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी नागरिकांमुळे, तेथील स्थानिक नागरिकांनाही लागली आहे. त्यामुळे, पुणे-मुंबई या व्यावसायिक नगरीत निर्मित होणारी कित्येक नाटके प्रत्येक महिन्यात परदेशवारी करून येत असतात. या परदेशवारीमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागते ते अमेरिकेचे. या देशात मोठ्या संख्येने मराठी माणसांसोबतच भारतीयांचे वास्तव्य आहे आणि मराठी नागरिकांमुळे, तेथील अमराठी भारतीय आणि स्थानिक नागरिकही नाटकांच्या प्रेमात आहेत. विशेष म्हणजे, नाटकांसाठी परदेशवारी करणाऱ्या मुंबई-पुण्याच्या नाटकांसोबत आता, नागपूरचे नावही अंकित होणार आहे. ‘स्वामी विवेकानंद’ या हिंदी नाटकाचा दौरा अमेरिकेत निश्चित झाला असून, अमेरिकेत नागपूरचे नाटक जाणारी ही पहिलीच घटना आहे. शुक्रवारीच नाटकासंबंधीच्या व्हीजा प्रक्रियेची पूर्णत: झाली असून, सप्टेंबरमध्ये हे नाटक थेट अमेरिकेकडे उड्डाण भरणार आहे. ‘स्वामी विवेकानंद’ या हिंदी-मराठी नाटकात स्वामी विवेकानंदांचे जीवन अधोरेखित करण्यात आले असून, विश्व धर्मसभेत दीडशे वर्षापूर्वी विवेकानंदांनी शिकागो येथे दिलेल्या संपूर्ण भाषणाचा समावेश या नाटकात करण्यात आला आहे. त्या घटनेला ११ सप्टेंबर २०१९ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत असून, याच तारखेला या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथेच सादर केला जाणार असल्याने, एक सुरेख योग जुळून आला आहे. त्यामुळे, दीडशे वर्षांपूर्वी धर्मसभेत गरजलेला स्वामी विवेकानंदांचा आवाज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी गरजणार आहे.आधी दुबई, आता अमेरिका - संजय पेंडसेयापूर्वी २०१७ मध्ये दुबईमध्ये या नाटकाचे तीन प्रयोग केले होते. त्यापूर्वीपासूनच या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथे करण्याचा आमचा मानस होता. त्या प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सहयोगाने पूर्णत: मिळाली आहे. आतापर्यंत या नाटकाचे १४९ प्रयोग पूर्ण झाले आहेत. दरम्यान या नाटकाचे अनेक प्रयोग मिळाले. मात्र, स्वामींच्या त्या भाषणाला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने, आम्ही या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथेच करण्याचा निर्धार केला असल्याने, अमेरिका दौऱ्यानंतर स्थगित केलेले सगळे प्रयोग करणार असल्याचे नाट्य निर्माते संजय पेंडसे यांनी सांगितले. अमेरिकेत सध्या सात प्रयोग निश्चित असून, प्रयोगाची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.स्वामींना महिलांची मानवंदनाया नाटकाचे लेखन शुभांगी भडभडे यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा सारिका पेंडसे यांनी सांभाळली आहे. नागपुरातून थेट अमेरिकेत नाटक सादर करण्याचा मान या दोन्ही महिलांना मिळाला असून, नागपूरच्या इतिहासात त्यांची नोंद होणार आहे. दुबईच्या निमित्ताने, त्यांनी हा मान आधीच मिळवला हे विशेष.
शिकागोत दीडशे वर्षानंतर पुन्हा होणार ‘त्या’ भाषणाची गर्जना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 8:29 PM
संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला होत असलेल्या दीडशेव्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जुळून आलेला हा योग निश्चितच कलावंतांच्या मनाला उभारी देणारा असून, शहरात कार्यरत असलेल्या विविध नाट्यसंस्था व रंगकर्मींना चेतना देणारा आहे.
ठळक मुद्दे‘स्वामी विवेकानंद’ नाटक सातासमुद्रापार : प्रथमच नागपूरच्या नाट्यचमूचा अमेरिका दौरा निश्चित