लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर धुडगूस घालणाऱ्या दराेडेखाेरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून १ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई बुधवारी (दि. ७) रात्री कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
आबिद खान हमीद खान (३०, रा. कामठी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान परिसरात गस्तीवर हाेते. ते रामटेकच्या दिशेने जात असताना त्यांना आबिद खान हमीद खान हा नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर धुडगूस घालत असल्याचे आढळून आले. संशय आल्याने या पथकाने सापळा रचत त्याला ताब्यात घेतले आणि झडती घेतली.
ताे कुठेतरी दराेडा टाकण्यासाठी जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्याला अटक केली. शिवाय, त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीची माेटरसायकल, ६८ हजार किमतीचा आयफाेन व ३,५०० रुपये राेख असा एकूण १ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून चाेरीच्या काही घटना उघड हाेण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी व्यक्त केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३९२ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल राऊत, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, विनोद काळे, शैलेश यादव, वींरेंद्र नरड, अरविंद भगत, सत्यजित कोठारे, प्रणय बनाफर, साहेबराव बहाळे यांच्या पथकाने केली.