नागपूर : दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे सर्व आरोपी मध्य प्रदेशमधील आहेत.
५ जुलै रोजी मध्यरात्री गिट्टीखदान पोलिस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना न्यू शांतीनगर, वेलकम सोसायटीच्या बाजूच्या मार्गावर संशयित लोक असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथे नऊ व्यक्ती संशयितपणे बसल्या होत्या. त्यांच्याजवळून पोलिसांनी दोन लोखंडी चाकू, लोखंडी तलवार, मोबाइल फोन, मिरची पावडर, दोरी, ब्लेड, पेचकस, कटर मशीन, सब्बल व दोन कार जप्त केल्या.
या साहित्याचा उपयोग करून दरोडा टाकण्याचा त्यांना प्लॅन होता. पोलिसांनी रमाकांत काशीप्रसाद दुबे (३२, पाठण, जबलपूर), भीमेंद्र परदेशी (४०, छिंदवाडा), विक्की रंगारे (३१, सौंसर, छिंदवाडा), अजय महेश कांबळे (२८, मुखेड, छिंदवाडा), रतन भागवत वानखेडे (३२, सौंसर, छिंदवाडा), मुरारी टेका निनोटे (४८, छिंदवाडा), जितेंद्र लक्ष्मण बडले (२८, निमनी, छिंदवाडा), गणेश चिंतामण पांढूरकर (४१, निमनी, छिंदवाडा), पंकज धनश्याम टवले (३०, सौंसर, छिंदवाडा), अशी आरोपींची नावे आहेत, तर अंधाराचा फायदा घेऊन सतीशकुमार भारे व भूपेंद्रसिंह लोधी हे दोन आरोपी फरार झाले. आरोपींकडून एकूण १८.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.