रियाज अहमद
नागपूर : औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांची तपासणी मंदावल्याने याचा फायदा विक्रेते घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेकांना औषधांचे बिल दिले जात नाही. डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’ला डावलून औषधींचा अधिक डोस दिला जात आहे. परंतु अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोरोनामुळे औषध विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. नागरिक आरोग्याला घेऊन अधिक सजग झाल्याने औषधांची विक्रीही वाढली आहे. याचा फायदा काही विक्रेते घेत असल्याचे शहरातील चित्र आहे. ग्राहक संघटनेनुसार, डॉक्टरांनी दिलेल्या ‘प्रिस्क्रिप्शन’नुसारच विक्रेत्यांनी औषधी देणे आवश्यक आहे. परंतु काही विक्रेते औषधांची पूर्ण स्ट्रिप ग्राहकांच्या माथी मारतात. याशिवाय, एखाद्या डॉक्टरांनी लिहिलेली औषधी विशिष्ट दुकानातच मिळत असल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. शहरात हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेष म्हणजे, ग्राहकाला औषधीच्या एमआरपीवर सूट मागण्याचा अधिकार आहे; परंतु अनेक औषधी विक्रेते याला गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
- तक्रार केल्यावरही उपाययोजना होत नाहीत
ग्राहक कल्याण परिषदेचे कार्यकारी सदस्य मो. शाहिद शरीफ म्हणाले, औषध प्रशासनाकडे औषधी विक्रेत्याची तक्रार केल्यावर अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद किंवा उत्तर मिळत नाही. उपाययोजनाही होत नाहीत. परिणामी, ग्राहकांची लूट होत आहे.
- तक्रारी प्राप्त होताच तपासणी
औषध प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जवळपास एक वर्ष नियमित तपासणी झाली नाही. परंतु तक्रारी प्राप्त होताच तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधींचे डोस औषधी विक्रेत्यांनी तेवढेच देणे अपेक्षित आहे. परंतु काही डॉक्टरांकडून औषधींचे कमी डोस लिहून दिले जात असल्याचेही दिसून आले आहे. औषधीचे बिल न देणाऱ्या विक्रेत्यांची तक्रार करायला हवी. हा ग्राहकाचा अधिकार आहे.
- पुष्पहास बल्लाळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)