लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या धारकाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा इमामवाडा पोलिसांनी छडा लावला. यातील तिघांना अटक करून दोन गुन्ह्यात चार लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.मंगळवारी १२ मार्चला इमामवाड्यात एक गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास करताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागल्याचेही रोशन यांनी स्पष्ट केले. इमामवाड्यातील अनिकेत अपार्टमेंटमध्ये राहणारा वैभव गुलाबराव देशमुख (वय २१) हा मोबाईलवर बोलत रस्त्याने जात होता. अचानक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तीन लुटारूंनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. त्याने इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठाणेदार मुकुंद साळुंके यांनी आपल्या सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी निर्जनस्थळी साध्या वेशात गस्त घालण्यास सांगितले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर हवलदार परमेश्वर कडू, रामेश्वर कडवे, श्रीकांत ठाकूर, अनंता बुरडे, शरद चव्हाण, शिपाई बाळू गिरी, राहुल झाडे,सुशील रेवतकर, विजय भोयर आणि किशोर येऊल हे लुटारूंच्या शोधात असताना रात्री ११ च्या सुमारास या पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर चेतन मदनलाल सूर्यवंशी (वय २०, रा. बिनाकी मंगळवारी, कांजी हाऊस चौक), कपिल प्रेमदास धारगावे (वय १९, रा. बिनाकी मंगळवारी) आणि अबोध देवानंद निमगडे (वय १९, रा. यशोधरानगर) हे तिघे संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. संशय बळावल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रस्त्याने जाणाऱ्यांचे मोबाईल लुटल्याची कबुली दिली. अशा प्रकारे त्यांनी इमामवाडा येथे दोन तर आणि सदर, गणेशपेठ आणि सक्करदरा येथे प्रत्येकी एक गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी नागपूर रेल्वेस्थानक परिसरातूनही चार मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दीड लाख रुपये किंमतीचे एकूण ११ महागडे मोबाईल जप्त केले.कोठडीतून दुसऱ्या टोळीचा छडाया तिघांची पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्यांनी यशोधरानगर येथे शुभम उत्तम सोनवणे (वय २०) हा आणि त्याची टोळी वाहनचोरीत सक्रिय असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतले.त्याने आपल्या तीन विधी संघर्षग्रस्त साथीदारांसह आठ वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यावरून तिन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी यशोधरानगर, तहसील आणि इमामवाडा परिसरातून तीन दुचाकी चोरल्या तर, सदर, गिट्टीखदान, पाचपावली, यशोधरानगर, धंतोली परिसरातून पाच दुचाकी चोरल्याचीही त्यांनी कबुली दिली. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी अडीच लाखांची वाहने जप्त केली आहे.वाहनचोरीसाठी विद्यार्थ्यांचा वापरया गुन्ह्याच्या छड्यातून वाहन चोरीसाठी अट्टल चोरटे लहान मुलांचा, विद्यार्थ्यांचा वापर करीत असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. बनावट चावीने दुचाकीचे कुलूप उघडून ही टोळी वाहने चोरून नेत होते. लहान मुले असल्याने त्यांचा कुणाला संशय येत नाही. ही बाब टोळीप्रमुखाच्या लक्षात असल्याने त्याने चोरीसाठी लहान मुलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचा वापर करून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. चोरीत सक्रिय असलेल्यांपैकी दोघे आठवी आणि नववीत शिकत असल्याचेही रोशन यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रपरिषदेला सहायक पोलीस आयुक्त घार्गे, इमामवाड्याचे ठाणेदार मुकुंद साळुंके प्रामुख्याने उपस्थित होते.