नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घ्यायला गेलेल्या आप्त यांची पार्किंगच्या नावाखाली लूट सुरू आहे. विमानतळ परिसरात कारचालकांकडून पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ थांब्याचे तब्बल १२० रुपये शुल्क घेण्यात येत आहे. मिहान इंडिया लिमिटेडने पाच वर्षांत प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून ११.२१ कोटी रुपयांची वसुली केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
पार्किंग शुल्कासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत संजय थूल यांना मिहान इंडिया लिमिटेडकडून माहिती प्राप्त झाली आहे. विमानतळावर पार्किंग शुल्कातून प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप संजय थूल यांनी केला आहे. पार्किंग शुल्कासंदर्भात एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (एएआय) देशातील विमानतळावर पार्किंग शुल्कासंदर्भात कोणतेही समान धोरण नाही. त्यानंतरही विमानतळाचे संचालन करणारी मिहान इंडिया लिमिटेड कंपनी प्रवाशांकडून अवाजवी शुल्क वसूल करीत असल्याचा आरोप थूल यांनी केला आहे. परिसरात पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ कार उभी राहिल्यास १० ते २० रुपयापर्यंत शुल्क वाजवी आहे, पण कंपनी थेट १२० रुपये शुल्क वसूल करीत आहे. यासंदर्भात एएआयच्या दिल्लीतील मुख्यालयात तक्रार केली आहे. पण याबाबत अजूनही खुलासा केला नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ओला आणि उबर टॅक्सीचालकाने परिसरात प्रवाशाला विमानतळ परिसरात सोडले तर कन्व्हेनियन्स चार्ज वसूल केला जातो. तो प्रवाशाला भरावा लागतो. काही कारचालकांकडून विमानतळ परिासरात प्रवेश करताच शुल्क वसूल केले जाते. हे चुकीचे असल्याचे थूल यांनी सांगितले.
माहितीच्या अधिकारांतर्गत अनेक बाबींचा खुलासा झाला आहे. मिहान इंडिया लिमिटेडने पाच वर्षांत ११ कोटी २१ लाख २४ हजार ७०४ रुपये पार्किंग शुल्क गोळा केले आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये ९१.४२ लाख, वर्ष २०१७-१८ मध्ये २.८८ कोटी, वर्ष २०१८-१९ मध्ये ३.२९ कोटी, वर्ष २०१९-२० मध्ये ३.६२ कोटी आणि वर्ष २०२०-२१ मध्ये ५० लाख रुपयांचा पार्किंग स्वरूपात कंपनीला महसूल मिळाला आहे. थूल म्हणाले, पार्किंग सुविधा प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी असते. १० ते २० रुपये शुल्क वाजवी आहे, पण अवाजवी शुल्क आकारून कंपनी प्रवाशांवर अनावश्यक भार टाकत आहे. विमानतळावर पार्किंग मोफत असावी.