लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी महापालिकेची यंत्रणा, पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. रुग्णांची लूट थांबावी यासाठी खासगी रुग्णालयात ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु रुग्णांची लूट सुरूच आहे. शहरातील रुग्णालयात बेड मिळत नाही. जीव वाचावा म्हणून बेडसाठी आटापिटा सुरू आहे. या परिस्थितीचा लाभ घेत उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी काही रुग्णालयात दोन ते तीन लाख तर कुठे चार ते पाच लाख घेतले जात आहे. रुग्णांची लूट सुरू असताना मनपाचे ऑडिटर काय करताहेत, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. दुसरीकडे मनपातील सत्तापक्षातील नेत्यांनी ऑडिटरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शहरातील रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी नागपुरातील शासकीय व खासगी रुग्णालयात ७,१४४ बेड आरक्षित करण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. दुसरीकडे बेडसाठी डिपॉझिट मोजावे लागत आहे. त्यात उपचारासाठी वेगळे शुल्क आकारले जात आहे. काही पैसेवाल्यांनी आधीच बुकिंग करून ठेवल्याची माहिती आहे. जो अधिक पैसे देईल त्याला बेड उपलब्ध होईल, अशी अनेक खासगी रुग्णालयांची भूमिका आहे.
...
विमा लागू असूनही लूट
खासगीकडून होणारी लूट टाळण्यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. आकस्मिक भेटी देऊन रुग्णालयांची तपासणी करणे अपेक्षित आहे. अनेक रुग्णांना वैद्यकीय विमा लागू असतानाही जादाची आकारणी करून लुटले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
....
ऑन द स्पॉट तपासणी का नाही?
मनपाने कुठल्याही कोरोनाबाधिताची लुबाडणूक होऊ नये म्हणून अधिग्रहित प्रत्येक खासगी रुग्णालयात ऑडिटर बसविला. रुग्णाला सुटी होण्यापूर्वी जादाची देयके आल्यास ती त्यांनी ऑन द स्पॉट तपासून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही ऑडिटर्स सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी आहेत तर, काहींना शुल्क आकारणीचे ज्ञान नसल्याची बाब पुढे आली आहे.
...
संदीप जोशी यांचा प्रशासनाला इशारा
खासगी रुग्णालयात होणारी कोविड रुग्णांची लूट थांबवा, अन्यथा आम्ही रुग्णासोबत आक्रमकपणे उतरू, याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा माजी महापौर संदीप जोशी यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. खासगी रुग्णालयांनी ८० टक्के रुग्ण शासकीय दराने तर २० टक्के खासगी दराने उपचार करणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बिलासंदर्भात पीडितांनी तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. तसेच मनपातील सत्तापक्ष कार्यालयात दररोज समस्या जाणून घेणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
....