लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या तासाभरात पेट्रोलपंपासह तीन ठिकाणी लुटमार करणाऱ्या टोळीतील दोन सशस्त्र गुंडांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चाकू आणि लुटलेली रक्कम जप्त करण्यात आली. फरार असलेल्या एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.सोेनेगाव येथील दीपक रामदयाल रहांगडाले (वय २७) हे सोनेगाव निपाणी येथील रहिवासी होय. ते एमआयडीसीतील कृष्णम रेस्टॉरेंटमध्ये काम करतात. ते आणि त्यांच्या सोबत काम करणारे तिघे रविवारी रात्री ११ वाजता काम आटोपून घराकडे जात होते. रस्त्यात अंधा-या ठिकाणी स्प्लेंडर मोटरसायकलवर (एमएच ४०/ बीएच १५०५) असलेल्या तीन आरोपींनी दीपकला पाण्याची बॉटल आहे का, असे विचारत थांबवले. त्यानंतर दीपक तसेच त्यांच्या सोबतच्यांना चाकूचा धाक दाखवून एक मोबाईल तसेच १५०० रुपये हिसकावून घेतले. या घटनेच्या अर्धा तासापूर्वी एमआयडीसी टी पॉर्इंटवर अशाच प्रकारे या भामट्यांनी एका तरुणाचा मोबाईल हिसकावून नेला. एक तासापूर्वी याच आरोपींनी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीत पेट्रोल भरून तेथील कर्मचा-याकडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या लुटमारीच्या घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. नियंत्रण कक्षामार्फत सर्व पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची तसेच गुन्हेगारांची माहिती कळविली. दरम्यान, घटनास्थळ परिसरातील एका बारजवळ दडून असलेल्या आरोपींनी पोलिसांचे वाहन पाहून वाडीकडे पळ काढला. एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती आणि पेट्रोल पंपाच्या कर्मचा-यांकडून मिळालेल्या तक्रारीमुळे वाडी पोलीसही आरोपींचा शोध घेत होते. नमूद क्रमांकाच्या मोटरसायकलवर आरोपी पळून जात असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. रवी उर्फ राकेश तिवारी (वय २४) आणि नीलेश सिडाम (वय १९) अशी आरोपींची नावे आहेत. ते आठवा मैल, वाडी येथील रहिवासी होय. त्यांच्याकडून चाकू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर पोलीस त्यांची आणि फरार साथीदाराची चौकशी करीत होते.
उपराजधानीत पेट्रोलपंपासह तीन ठिकाणी लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 15:04 IST
अवघ्या तासाभरात पेट्रोलपंपासह तीन ठिकाणी लुटमार करणाऱ्या टोळीतील दोन सशस्त्र गुंडांना नागपुरात पोलिसांनी अटक केली.
उपराजधानीत पेट्रोलपंपासह तीन ठिकाणी लूटमार
ठळक मुद्देवाडी, एमआयडीसीत गुन्हेदोघांना अटक, एक फरार