लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मूर्तिकाराला जखमी करून त्याचे सव्वा तीन लाखाचे दागिने लुटण्याची योजना त्याच्या मित्रानेच आपल्या साथीदारांसह बनवली हाेती. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. अक्षय रवी लवसरे (२५) रा. अमरनगर, हर्षल दिलीपराव ढाले (२४) लाडीकर ले-आऊट, आदित्य गजानन भोंडवे (२०) आणि सरी सारंग बोरकर (२०) रा. तुपकर चौक, सक्करदरा अशी आरोपीची नावे आहेत. अयोध्यानगर येथील रहिवासी संजय तिवारी मूर्तिकार आहे. यातील मूख्य सूत्रधार अक्षय आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तो पूर्वी तिवारीच्या घराजवळच राहत होता. त्यामुळे तो त्याला ओळखतो. त्याने २४ एप्रिल रोजी तिवारीला फोन करून २०० रुपये मागितले. तिवारी त्याला पैसे देण्यासाठी म्हाळगीनगर चौकात आले. अक्षयने तिवारीची ॲक्टिव्हा स्वत: चालवीत त्याला मागे बसविले. लघुशंका करण्यासाठी तिवारी एका शेतात थांबले.. तेव्हा तीन युवकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी तिवारीच्या जवळचे तीन लाखांचे दागिने लुटले. त्यांना जखमी करून फरार झाले. तिवारीच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
अक्षय जुना गुन्हेगार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. आराेपींनी हल्ला करताना अक्षयला केवळ घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि अक्षय तेथून पळून गेला. पोलिसांनी जेव्हा विचारपूस केली तेव्हा आरोपीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सुरुवातीला त्याने सांगितले. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली. तिवारी बदनामीच्या भीतीने तक्रार करणार नाही, असे अक्षयला वाटत होते. त्यामुळेच त्याने त्याला लुटण्याची योजना बनवली. आरोपींजवळून दागिने, वाहन, मोबाईल आदीसह ३.६० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई एपीआय स्वप्निल भुजबळ, कर्मचारी मनोज नेवारे, प्रवीण गाणार, दीपक मोरे, शैलेश ठवरे, नृसिंह दमाहे, ललित तितरमारे, चंद्रशेखर कौरती, आशीष तितरमारे आदींनी केली.