लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकीदाराचे हात बांधून तुकडोजी चौकाजवळच्या एका वाईन शॉपचे शटर तोडून सशस्त्र चोरट्यांनी आतमधील मद्य लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र काऊंटर समोरच्या मजबूत लोखंडी गेटचे कुलूप तोडण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांना मद्याऐवजी तेथील काऊंटरमध्ये ठेवलेली ३ ते ४ हजारांची नाणी नेण्यावरच समाधान मानावे लागले. रविवारी पहाटे ३.१५ ते ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.तुकडोजी चौकाजवळ श्री प्रसाद वाईन शॉप आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारने वाईन शॉप बंदीचे आदेश दिल्यापासून हे वाईन शॉपही बंदच आहे. वाईन शॉपच्या समोर एक वृद्ध चौकीदार रात्री झोपतो. रविवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास एका आॅटोतून पाच सशस्त्र चोरटे आले. त्यांनी आॅटो दूरवर अंधारात उभा केला आणि येता येताच त्यांनी चौकीदाराचे हात बांधून त्याला धमकी देत गप्प राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर चोरटे शटर उचकटून आतमध्ये शिरले. वाईन शॉपच्या काऊंटरच्या पलीकडे मजबूत लोखंडी गेट असून त्याला जाडजूड कुलपे आहेत. ती तोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे चोरट्यांनी काऊंटरमध्ये ठेवलेली तीन ते चार हजार रुपयांची नाणी ताब्यात घेऊन बाजूच्या गोदामाकडे धाव घेतली. तेथेही मोठा मद्यसाठा होता. मात्र गोदामाच्याही लोखंडी गेटचे कुलूप तोडण्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, दिवस उजळत असल्यामुळे रस्त्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची वर्दळ सुरू झाल्याचे लक्षात आल्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला. चोरटे निघून गेल्यानंतर चौकीदाराने बाजूच्या एका हॉस्पिटलसमोर जाऊन तेथील गार्डकडून आपले हात सोडवून घेतले. त्यानंतर वाईन शॉपच्या मालकाला माहिती दिली. त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना कळविले. हुडकेश्वर पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला. सुमारे दोन तासांचा घटनाक्रम वाईन शॉपच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आहे.दीड महिन्यातील आठवी घटनावाईन शॉप बिअर बारमध्ये चोरी होण्याची ही गेल्या दीड महिन्यातील आठवी घटना आहे. यापूर्वीही अशा घटना विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हेही दाखल झाले आहेत; मात्र एकाही चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.