लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘राबोटिक सर्जरी’कडे आता नव्या अपेक्षेने पाहिले जात आहे. गरीब व सामान्य रुग्णांच्या आवाक्यात ही ‘सर्जरी’ आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने २५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यातील १६ कोटी ८० लाखांचा निधी प्रदान करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. यामुळे लवकरच मेडिकलमध्ये रोबोटिक सर्जरीला सुरुवात होईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागामधील अद्यावत शस्त्रक्रिया गृहाचा (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर) लोकार्पण सोहळा गुरुवारी पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर महानगरपालिकेचे सत्ता पक्षनेता संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, न्यूरोसर्जरीचे विभागाचे प्रमुख डॉ. प्रमादे गिरी उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, नागपुरात ७० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत. हा विकास होत असताना आरोग्य क्षेत्राकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. पाच वर्षांपूर्वी आरोग्य व्यवस्था ढिसाळ होती. आता बरेच विकासात्मक बदल झाले आहेत. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या कार्यकाळात मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला चांगले दिवस आले आहेत. विशेष म्हणजे, जखमी रुग्णाच्या मेंदूला इजा झाल्यास त्याच्यावरील अद्यावत उपचारापासून ते शस्त्रक्रियेच्या सोयी मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. डॉ. प्रमोद गिरी यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे.
‘न्यूरो नेव्हीगेशन’ यंत्रासाठी १.१८ कोटी रुपये
‘न्यूरो नेव्हीगेशन’ तंत्रज्ञान हे आजाराचे नेमके ठिकाण आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी नेमकी दिशा आणि ठिकाण दर्शवते. शस्त्रक्रियेसाठी योग्य दिशेने जाण्यास मार्गदर्शन करते. सर्वसामान्य लोकांसाठी या सुविधेचा वापर मोठा खर्चिक आहे. म्हणूनच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या शासकीय रुग्णालयात या यंत्रासाठी १.१८ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. सोबतच २५ व्हेन्टीलेटरसाठी २.८८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. मेडिकलची प्रगतीकडे वाटचाल-डॉ. निसवाडेडॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले, मेडिकलमध्ये एकेकाळी दोन हजार रुग्णांची असलेली ‘ओपीडी’ आज पाच हजारावर पोहचली आहे. आता ती सहा हजारावर नेण्याचा प्रयत्न आहे. उपलब्ध सोयी व तंत्रज्ञानामुळे हे शक्य होऊ शकले आहे. मेडिकलमध्येही सुपर स्पेशालिटीची ‘ओपीडी’ सुरू करण्यात आल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. न्यूरोसर्जरीमध्ये ‘एमसीएच’ -डॉ. गिरीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, गेल्या दहा वर्षांत १७ हजार ‘न्यूरोसर्जरी’ करण्यात आल्या आहेत. हा आकडा फार मोठा आहे. म्हणूनच मेंदू शस्त्रक्रियेत ‘मॉड्युलर ओटी’ ही आज काळाची गरज झाली आहे. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या पुढाकारामुळे हे बांधकाम होऊ शकले आहे. आता न्यूरोसर्जरीमध्ये ‘एमसीएच’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. याचा फायदा या विद्यार्थ्यांसोबतच रुग्णांना होणार आहे.