नागपूर मेडिकलमध्ये १२ आठवड्यात कार्यान्वित होणार रोबोटिक सर्जरी सिस्टीम
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 1, 2023 05:00 PM2023-03-01T17:00:45+5:302023-03-01T17:01:46+5:30
Nagpur News मेडिकलमध्ये येत्या १२ आठवड्यात रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापित केली जाईल, अशी ग्वाही हाफकिन इन्स्टिट्यूटने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
राकेश घानोडे
नागपूर : मेडिकलमध्ये येत्या १२ आठवड्यात रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापित केली जाईल, अशी ग्वाही हाफकिन इन्स्टिट्यूटने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. राज्यामधील सरकारी रुग्णालयांना आवश्यक औषधे व वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची जबाबदारी हाफकिन इन्स्टिट्यूटकडे आहे. ते रोबोटिक सर्जरी यंत्र अमेरिकेतून आणणार आहेत.
विदर्भातील सरकारी रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रोबोटिक सर्जरी सिस्टीमसाठी राज्य सरकारने २१ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. असे असताना रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापनेसाठी विलंब केला जात होता. त्यामुळे न्यायालयाने हाफकिन इन्स्टिट्यूटला फटकारले होते. रोबोटिक सर्जरी सिस्टीम कार्यान्वित झाल्यानंतर मेडिकल हे सदर अत्याधुनिक सुविधा असलेले मध्य भारतातील पहिले रुग्णालय ठरेल. या सिस्टीमचे विविध फायदे आहेत. या सिस्टीमद्वारे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण तातडीने बरे होतात. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताचा अधिक प्रमाणात अपव्यय होत नाही. शस्त्रक्रिया अचूकपणे केली जाते.