लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) येत्या काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मेडिकलच्यावतीने डॉ. राज गजभिये यांनी या संदर्भातील ‘प्रेझेंटेशन’ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यावेळी त्यांनी तातडीने यंत्रासाठी लागणारा १७ कोटींच्या निधीला मंजुरी दिली. जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा हा निधी मेडिकल अधिष्ठात्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्याचे निर्देशही दिले.रोबोटिकसारख्या उच्चप्रतीची सेवा देण्यासाठी मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाने पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावाला गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली होती. यातील पहिल्या टप्प्यातील १६ कोटी ८० लाखांचा निधी जिल्हा वार्षिक योजनांतर्गंत खनिकर्म विभाग उपलब्ध करून देणार होते. याला शासनाने मंजुरीही दिली होती. परंतु ३१ मार्च २०१९ पर्यंत पुनर्र्विनियोजनाद्वारे हा निधी प्राप्त न झाल्याने प्रशासकीय मान्यता रद्द झाली. चालू आर्थिक वर्षात मेडिकलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न झाले. यात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या समितीने शस्त्रक्रियेला लागणाऱ्या रोबोटिक यंत्रांसाठी १७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. याला घेऊन शुक्रवारी रविभवनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेडिकलची बैठक बोलावली होती. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेचे ‘प्रेझेंटेशन’ दिले. यावर पालकमंत्री यांनी रोबोटिक यंत्रासाठी लागणारा निधी तातडीने मेडिकल अधिष्ठात्यांचा खात्यात जमा करण्याबाबतचा सूचना दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, न्युरो सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद गिरी आदी उपस्थित होते.