लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या उत्साहवर्धक महोत्सवाचा समारोप हा तसा भावनिक आणि उदास करणारा असतो. मात्र गेल्या चार दिवसांपासून ज्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलने नागपूरकरांना अनोख्या आनंदाची भरभरून मेजवानी दिली, त्याचा समारोपही तेवढाच रॉकिंग ठरला. शहराच्या दक्षिणेकडे महाराष्ट्रातील रसिकांच्या ‘गालावर खळी’ उमटविणारा गायक स्वप्निल बांदोडकर सादरीकरण करीत असताना केंद्रस्थानीही उत्साही हालचाली सुरू होत्या. देशपांडे सभागृहात लावणीसोबत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात देशी व विदेशी कलावंतांच्या रॉक बॅन्डची धूम सुरू होती.कार्निव्हल परेडमध्ये प्रेक्षकांची धमाल उडविणाऱ्या रशिया व युक्रेनच्या कलावंतांनी धमाकेदार सादरीकरण केले. दमक्षेसां केंद्राच्या मंचावर रशियन बालेने पाश्चात्य गीत-संगीतासह हिंदी सिनेमा गीतांवरही बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले. यासोबत युक्रेनच्या तरुणींचे बासरी, व्हायोलिन व सेक्सोफोनवरील सूर येथे निनादले. याशिवाय मोबाईल सिम्फोनी बॅन्डच्या नागपूरकर कलावंतांनीही आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना रॉकिंग एन्जॉय करण्याची संधी दिली. चार दिवस श्रोत्यांना उत्सवाच्या अनोख्या जगात नेणाऱ्या या फेस्टिव्हलचा अंतिम टप्पा आनंदाच्या परमोच्च बिंदूवर जाऊन थांबला.