रासायनिक खतांचा मारा : पोटॅशचा मातीत होतोय गोळा; कसा होईल सात-बारा कोरा जितेंद्र ढवळे नागपूरतुम्ही आजारी असाल तर कुठे जाता, हा काय प्रश्न झाला ? डॉक्टरांकडेच जावे लागते. मग तुमची शेती आजारी असेल तर? शेती कधी आजारी पडते का? होय तुमची शेती आजारी आहे आणि तेही जास्त प्रमाणात. रासायनिक खतांच्या अतोनात माऱ्यामुळे नागपूर जिल्ह्यातील जमिनीचे खडकात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हे खडक आता दिसत नसले तरी भविष्यातील पिढ्यांना याचा फटका बसणार आहे. जमीन आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत झालेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपूर जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाच्या वतीने या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९ हजार ८९५ मातीच्या नमुन्यांची चाचणी या वर्षांत करण्यात आली. या चाचणीत शेतजमिनीत आॅर्गनिक कार्बन ( सेंद्रीय कर्ब) चे प्रमाण निर्धारित क्षमतपेक्षा कमी आढळून आले आहे. आॅर्गनिक कार्बनचे प्रमाण कमी झाल्याने सर्वाधिक पहिला फटका शेतजमिनीच्या उत्पादन क्षमतेला बसतो आहे. यासोबत नायट्रोजन (स्फुरद) चे प्रमाण वाढले आहे. यात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि पानांना गडद हिरवा रंग येतो. सर्वाधिक धोकादायक म्हणजे पोटॅशियमची (पालाश) रासायनिक खतांच्या वापरांतून जास्त प्रमाणात मात्रा देण्यात येत असल्याचे विविध नमुन्यांच्या चाचणीतून आढळून आले आहे. याचा फटका लगेच बसत नसला तरी जमिनीचे पाषाणात (दगड-वाळू) रूपांतर होण्याच्या आंशिक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालाशचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास जमिनीच्या उत्पादन क्षमतेत सातत्याने घट नक्कीच होणार आहे.
-तर शेतात होतील खडक !
By admin | Published: March 03, 2016 2:56 AM