संत्रानगरीत उत्साह : लवकरच येणार नियुक्तीचा आदेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाधिवक्ता रोहित देव, मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व सर्वोच्च न्यायालयातील वकील मनीष पितळे हे तीन नागपूरकर विधिज्ञ मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती होणार आहेत. त्यांना नियुक्तीसंदर्भात शुक्रवारी सुचना देण्यात आली. नियुक्तीचा आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. या विधिज्ञांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती होणार असल्यामुळे संत्रानगरीतील विधी क्षेत्रात उत्साह निर्माण झाला आहे. या तीन विधिज्ञांसह मुंबई येथील वकील अॅड. संदीप शिंदे, अॅड. रियाज कापडिया व अॅड. चेतन कापडिया आणि विविध आठ जिल्ह्यांतील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांचीही अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती केली जाणार आहे. सर्वांना त्यांचे कार्य थांबविण्यास सांगण्यात आले आहे. नियुक्ती आदेश जारी झाल्यानंतर पुढील मंगळवारी किंवा शुक्रवारी सर्वांना न्यायमूर्तिपदाची शपथ दिली जाईल. उन्हाळ्याच्या सुट्या ४ जून रोजी संपत असून ५ जूनपासून उच्च न्यायालयात नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे. तेव्हापर्यंत सर्वांना मुंबई, औरंगाबाद व नागपूर यापैकी एका ठिकाणी नियुक्ती दिली जाईल. अॅड. देव शांत स्वभावासाठी ओळखले जातात. गेल्या ३० वर्षांच्या वकिली व्यवसायात त्यांनी हजारावर प्रकरणे हाताळली आहेत. एल.एल.बी. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९८६ पासून वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्या हाताखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. १९९० पासून ते स्वतंत्र झाले. आधी सहयोगी महाधिवक्ता व नंतर नियमित महाधिवक्ता म्हणून कार्य करताना त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणे प्रभावीपणे हाताळली. अॅड. भारती डांगरे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील आहेत. त्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनाची बाजू प्रभावीपणे मांडत आहेत. त्या कामाप्रती समर्पणभावासाठी ओळखल्या जातात. त्यांनी एल.एल.बी. पदवीमध्ये १२ सुवर्ण पदके मिळविली होती. त्यानंतर त्यांनी एल.एल.एम. पदवी पूर्ण केली. त्या महिला चळवळीशी जुळल्या आहेत. सुरुवातीला त्या सहायक सरकारी वकील होत्या. त्यानंतर त्या अतिरिक्त सरकारी वकील व पुढे मुख्य सरकारी वकील झाल्या. अॅड. मनीष पितळे यांनी माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हाताखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. नागपुरात अनेक वर्षे वकिली केल्यानंतर ते दिल्लीत स्थानांतरित झाले. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली आहेत. या नियुक्त्यांचे सर्वांनी स्वागत केले आहे.
रोहित देव, भारती डांगरे, मनीष पितळे न्यायमूर्ती
By admin | Published: May 27, 2017 2:42 AM