काटोल (नागपूर) : केंद्र सरकारने अतिरिक्त कर वाढविला म्हणून पेट्रोल व गॅसचे दर वाढले. पर्यायाने महागाई वाढत आहे. याचे खापर मात्र राज्यावर फोडले जात आहे. राज्याची केंद्र सरकारकडे २८ हजार कोटींची थकबाकी आहे यावर केंद्र सरकार का बोलत नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला.
माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काटोल पंचायत समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिरासह विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आ. पवार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारचा समाचार घेत अनिल देशमुख निर्दोष असून ते लवकरच बाहेर येतील, असा विश्वास व्यक्त केला.
पवार म्हणाले, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण तो यशस्वी होणार नाही. काटोल मतदार संघात ६७४ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली, हे अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरती देशमुख, सलील देशमुख, जि. प. सदस्य समीर उमप, पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधा खराडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे, माजी सभापती तारकेश्वर शेळके, शेकापचे राहुल देशमुख, राजेश डेहणकर, डॉ. अनिल ठाकरे, जयंत टालाटुले, सुभाष कोठे, पं. स. सदस्य अरुण उईके, माजी जि. प. सदस्य चंद्रशेखर कोल्हे, चंद्रशेखर चिखले आदी उपस्थित होते.
या कामांचे झाले भूमिपूजन
रोहित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद स्टेडियमवर बांधण्यात येणाऱ्या बॉक्सिंग रिंगच्या वास्तूचे भूमिपूजन, येनवा सर्कलमधील कलंभा-गोंडी दिग्रस-मेंडकी बोरी या रस्त्याच्या कामांसह इतर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.