नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ सभागृहात पहिलंच भाषण केलं. त्यांच्या पहिल्या भाषणाची चांगलीच चर्चा होत असून आपल्या पहिल्या भाषणात शिक्षण या विषयाला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यासोबतच, इतरही विषय गंभीर असल्याचं सांगत महायुती सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाल्याचं त्यांनी विविध अहवालाच्या माध्यमांतून दाखवून दिलं.
देशातील आज शिक्षणाची परिस्थिती काय आहे, शालेय शिक्षण 2015-16 च्या अहवालानुसार महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता. आज 2018-19 च्या अहवालानुसार महाराष्ट्राची घसरण होऊन आपण सहाव्या क्रमांकावर आलोय. 1 लाख 22 हजारांपेक्षा जास्त मुलं आणि मुली शिक्षणापासून वंचित असल्याचं अहवालातून दिसतंय. तर, मुलींच्या शिक्षणाबाबत गेल्या 5 वर्षात उदासिनता वाढल्याचं दिसून आलंय, असे म्हणत रोहित पवार यांनी पहिल्याच भाषणात शिक्षणाचा मुद्दा विधानसभा सभागृहात उपस्थित केला.
मुलींच्या शिक्षणासाठी असलेल्या अहिल्याबाई होळकर योजना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, 10 वी व 12 वी वेतन, याबाबत रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले. महिला अत्याचाराचे प्रमाणही 6 टक्क्यांनी वाढले आहे. महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा नंबर आहे. बलात्कार, अपहरण, विनयभंग यांसारख्या घटना घडतात, तेव्हा माझी आई असेल, बहिण असेल किंवा ओळखीची व्यक्ती असेल, आम्हाला भिती वाटतेच, असे म्हणत महिलांवरी अत्याचाराचा मुद्दाही रोहित पवारांनी उचलला होता.
बचत गटाचा मुद्दाही महत्त्वाचा असून अंगणवाडी सेविकांचाही विषय राज्यपालांनी भाषणात घेतला होता. आरोग्य, महिला व बालकल्याण विभागाकडेही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या पहिल्याच भाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी, विधानसभा अध्यक्ष आपली वेळ संपली असे म्हणत असतानाही, अध्यक्ष महोदय बोलू द्या जास्त वेळ घेणार नाही, विषय महत्त्वाचे आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी भाषण केले.