आॅनलाईन लोकमतनागपूर : देशातील अनेक प्रांताच्या पोलिसांना हवा (वॉन्टेड) असलेला कुख्यात महाठग रोहित वासवानी याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पाचपावली पोलिसांनी यश मिळवले.पाचपावलीतील वैशालीनगरात राहणारा वासवानी याचे दहा नंबर पुलाजवळ कार्यालय आहे. २०१४ मध्ये त्याने टीसीएल कंझूमर कंपनी काढली. या कंपनीत भागीदारी आणि लाखोंचा लाभ मिळवून देतो, असे सांगून अविनाश चव्हाण (रा. जयताळा, सुभाषनगर) यांच्याकडून काही रक्कम तसेच त्यांची काही कागदपत्रे घेतली. त्या आधारे बँकेत खाते उघडले. नंतर दुसऱ्यांना गंडवण्यासाठी या बँक खात्याचा गैरवापर केला. अनेकांची रक्कम हडपल्यानंतर वासवानी नामनिराळा राहिला. मात्र, ज्यांनी या खात्यात रक्कम जमा केली होती, त्यांच्याकडून चव्हाण यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी मे २०१७ मध्ये पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर वासवानीची शोधाशोध सुरू झाली. कपडे बदलवल्यासारखे वेगवेगळे नाव बदलविणाऱ्या वासवानीला राजस्थान पोलिसांनी अटक केली असून तो जयपूरच्या कारागृहात बंद असल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पाचपावलीचे पोलीस जयपूरला पोहचले आणि त्यांनी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे महाठग वासवानीला अटक केली. त्याला शुक्रवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. आज त्याला कोर्टात हजर करून त्याचा पीसीआर मिळवण्यात आला.
देशभरात १६ गुन्हे दाखलअनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या महाठग वासवानीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात १६ गुन्हे दाखल आहेत. राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनाही तो वॉन्टेड आहे.