लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ साली विमान अपघातातील मृत्यू हे आजही एक रहस्य आहे. त्यापुढच्या काळात सोव्हिएत रशिया, जपान, जर्मनी आदी देशातून वेगळे पुरावे समोर येतात. याशिवाय उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे राहणारे ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याच्या रहस्यमय गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींचे रहस्य उलगडण्यात कोणत्याच सरकारने सहकार्य केले नाही, अशी खंत प्रसिद्ध लेखक आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली.विदर्भ साहित्य संघ व राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेताजी, तुमि कोथाय?’ या विशेष व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग हे अध्यक्षस्थानी होते. हर्डीकर यांनी सांगितले, विमान अपघातात नेताजींच्या मृत्यूच्या बातमीनंतरही अनेक वर्ष ते परदेशात आणि वेगवेगळ्या वेशात भारतात राहत असल्याच्या अनेक अफवा ६०-७० च्या दशकात पसरल्या होत्या. यात सर्वात महत्त्वाचे रहस्य त्यांच्या गुमनामी बाबा म्हणून असलेल्या वास्तव्याचे आहे. सुरेश बाबू यांच्या कन्या व नेताजींच्या पुतणी ललिता बोस यांचा शोध सुरू होता. अशावेळी नेताजी उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे ‘भगवान बाबा’ या नावाने राहत असल्याची माहिती ‘नार्दन इंडिया’ या पत्रिकेतील लेखमालेतून प्रसिद्ध झाली होती. तोपर्यंत या गुमनामी बाबांचा मृत्यू झाला होता. १९८५ साली त्या आधारावर शक्तीसिंह यांनी ललिता बोस यांना फैजाबाद येथे चौकशी करण्याची सूचना केली. बोस यांनी पाहिले असता, नेताजींचे अस्तित्व दर्शविणारे अनेक साहित्य या गुमनामी बाबांच्या खोलीत आढळून आले होते. यात नेताजी यांच्या आईवडिलांसह त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्र, नातेवाईकांची पत्रे, शासकीय दस्तावेज आदींचा समावेश होता. ललिता बोस यांनी तत्कालीन उत्तरप्रदेश सरकारकडून सहकार्याची अपेक्षा केली, मात्र त्यांना ते मिळाले नाही. पुढे त्यांनी न्यायालयात जाऊन हे साहित्य सुरक्षित केले. पुढे अयोध्येत राममंदिराचे टाळे उघडले गेल्याने राजकारण त्याकडे वळले आणि हा विषय मागे पडल्याची खंत हर्डीकर यांनी व्यक्त केली. हे साहित्य अयोध्येमध्ये गुमनामी बाबांच्या दालनात ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.१९४५ च्या विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान पं. नेहरू आणि सरदार पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे टाळत १९५६ पर्यंत रेंगाळत ठेवली. त्यावेळी जनतेनेही चौकशीची मागणी लावून धरली नसल्याची खंत हर्डीकरांनी व्यक्त केली.१९७५ पर्यंत भारतीय गुप्तचर संस्थांमध्ये ब्रिटिशांचा हस्तक्षेप राहिल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढे गुमनामी बाबा यांच्याबाबातही पत्रकारांनी व अभ्यासकांनी अनेक पुरावे गोळा केले. त्यावर चौकशीसाठी न्या. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेत आयोग नेमण्यात आला होता. वाजपेयी सरकारच्या काळात पुढाकार घेतला गेला. मात्र बाबांच्या साहित्यांची डीएनए टेस्ट किंवा इतर आधुनिक प्रक्रिया करण्याबाबत कुणीही लक्ष दिले नसल्याचे ते म्हणाले. एवढेच नाही तर नेताजींचे दस्ताऐवज सार्वजनिक करण्याबाबतही राजकारण झाल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीत भाजपा याचा लाभ घेणार या दबावातूनच ममता बॅनर्जी यांनी ६४ फाईली सार्वजनिक केल्याचेही त्यांनी नमूद केले. अभ्यासकांनी नेताजींबद्दलचे संशोधन करावे व त्यांचा देदीप्यमान इतिहास देशासमोर यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संचालन नितीन सहस्रबुद्धे यांनी केले.
नेताजींचे रहस्य शोधण्यात सरकारांची भूमिका उदासीन : आनंद हर्डीकरांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 1:07 AM
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ साली विमान अपघातातील मृत्यू हे आजही एक रहस्य आहे. त्यापुढच्या काळात सोव्हिएत रशिया, जपान, जर्मनी आदी देशातून वेगळे पुरावे समोर येतात. याशिवाय उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे राहणारे ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याच्या रहस्यमय गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींचे रहस्य उलगडण्यात कोणत्याच सरकारने सहकार्य केले नाही, अशी खंत प्रसिद्ध लेखक आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्दे‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचा दावा