नागपूर : देवांशी सामान्य मुलांसारखी नव्हतीच. वैद्यकीय भाषेत म्हणावे तर बाैद्धिक अक्षम पण सामान्यांच्या भाषेत मेंदू कमजाेर असलेली. कायम बुद्धीच्या खेळात प्रावीण्य मिळविणाऱ्यांचाच गवगवा हाेणाऱ्या जगात निसर्गाने तिला अक्षम मेंदू घेऊन जन्माला घातले; पण गुणवत्ता शारीरिक सक्षमतेने ठरवावी की मनाच्या मजबुतीने निर्माण करावी, या प्रश्नालाच तिने आव्हान दिले. कारण तिच्या कर्तृत्वाने राष्ट्रीय पुरस्काराच्या निवडकर्त्यांनाही थक्क केले आणि बाैद्धिक अक्षमतेच्या श्रेणीत ‘राेल माॅडेल’ राष्ट्रीय पुरस्कार देण्यास भाग पाडले. राष्ट्रपती रामनाथ काेविद यांच्या हस्ते येत्या ३ डिसेंबर राेजी विज्ञान भवन, दिल्ली येथे तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
काेण आहे ही देवांशी आणि तिचे कर्तृत्व का माेठे आहे, या प्रश्नाचे उत्तर साेबतचे छायाचित्र पाहिल्यावर लक्षात येईल आणि साेबतच लक्षात येईल समाजाने अक्षम माणलेल्या आपल्या मुलीला सक्षम करणाऱ्या तिच्या आईवडिलाच्या समर्पणही. ही आहे देवांशी जाेशी. नागपुरात जन्मलेली देवांशी आता दिल्लीतील वसंतकुंज येथे बिग बाजारमध्ये फॅशन विभागात पूर्णवेळ कर्मचारी म्हणून काम करते.
न्यूरो-डायव्हर्सिटी श्रेणीत कुठलीही विशेष सवलत न घेता अतिशय सक्षमपणे उत्साहात काम करते, तेही मागील आठ वर्षापासून. स्वत:च्या कर्तृत्वाने बौद्धिक अक्षमतांबद्दल असलेला समाजातील गैरसमज देवांशीने एका क्षणात पुसून टाकला आहे. तिच्या याच कर्तृत्वासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार’मध्ये या श्रेणीत राेल माॅडेल पुरस्कार तिने प्राप्त केला आहे.
देवांशी ही डाउन सिंड्रोम(Down Syndrome) असलेली स्वावलंबी मुलगी आहे. देवांशीचा जन्म नागपूरचा आहे. नववीपर्यंतचे तिचे शिक्षण नागपुरातील सामान्य शाळेतच झालेले आहे. देवांशीने नॅशनल ओपन स्कूलमधून दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. तिने विविध कौशल्य प्रशिक्षणही घेतले आहे. दिल्लीत न्यूरो-डायव्हर्सिटी श्रेणीत पूर्णवेळ काम करणारी ती पहिलीच आहे.
तिचे कर्तृत्व एवढ्यापुरते मर्यादितही नाही. देवांशी नियमितपणे ऑनलाईन, ऑफलाईन कार्यक्रमांत आपल्या अनुभवाविषयी वक्ता म्हणून सांगत असते. तिच्या बहुआयामी व्यक्तित्वाची कौतुक दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतलेली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ‘उत्कृष्ट कर्मचारी’ म्हणूनही तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. २०२० मध्ये तिला संयुक्त राष्ट्र जिनेव्हा येथे बोलविण्यात आले होते; परंतु कोरोना महामारीमुळे देवांशीला जाता आले नाही. या वर्षी मात्र ऑनलाईन माध्यमाने देवांशीने आपले विचार संयुक्त राष्ट्राच्या मंचावर मांडले. देवांशीला फोटोग्राफीचा छंद आहे. ती समाजमाध्यमांवरही सक्रिय असते. या सर्व वाटचालीत वडील अनिल जोशी आणि आई रश्मी जोशी यांचे भक्कम पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे.
महाराष्ट्रातील ९ दिव्यांगांनाही पुरस्कार
चलन अक्षमता श्रेणीत दृष्टिदाेष असलेल्यांमध्ये नागपूरचे राजेश आसुदानी यांच्यासह महाराष्ट्रातील नऊ दिव्यांगांना पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगलीच्या डॉ. पूनम अण्णासाहेब उपाध्ये, मुंबईच्या निकिता वसंत राऊत यांना ‘उत्कृष्ट कर्मचारी’ या श्रेणीत, दिव्यागांसाठी उत्कृष्ट काम करणऱ्या‘वैयक्तिक आणि संस्थांच्या श्रेणी’त सनिका बेदी, चलन अक्षमता श्रेणीत लातूरच्या प्रीती पाेहेकर, काेल्हापूरच्या देवदत्ता माने, मुंबईच्या नेहा पावसकर, श्रवणदाेष असणारे औरंगाबादचे सागर बडवे, बाैद्धिक अक्षमता श्रेणीत काेल्हापूरचा प्रथमेश दाते; तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून काेल्हापूरची वैष्णवी सुतार यांचाही समावेश आहे.