लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडिलांची हत्या केल्यानंतर मनोरुग्ण सिकंदर रंगारी मृतदेहाच्या शेजारी पलंगावर बराच वेळ चिवडा खात बसून होता. दरम्यान, त्याची विकृती लक्षात घेत पोलिसांनी गुरुवारी पहाटे त्याला मनोरुग्णालयात भरती केले. एमआयडीसी हिंगणा परिसर सुन्न करून सोडणाऱ्या हत्याकांडातील हा अत्यंत संतापजनक पैलू उघड झाला आहे.
वानाडोंगरीच्या पालकर ले-आऊटमध्ये राहणारा मनोरुग्ण सिकंदर रंगारी (वय २७) याने आई बाहेर गेल्याची संधी साधून त्याचे वडील सम्राट रंगारी (५५) यांची बुधवारी रात्री धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असताना तो अर्धनग्न अवस्थेत पलंगावर ताटात चिवडा घेऊन बसला. दरम्यान, माहिती कळताच एमआयडीसी पोलीस तेथे पोहोचले. रंगारीच्या घराचे दार आतून बंद होते. वारंवार प्रयत्न करूनही सिकंदर दार उघडत नसल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून दार उघडले. तेव्हा विकृत रंगारी वडिलांच्या मृतदेहाशेजारी चिवडा खाताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पोलीस ठाण्यातही त्याचे विकृत चाळे सुरू झाले. तो स्वतःला धोका पोहोचवू शकतो. इतरांनाही त्याच्यापासून धोका असल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्याला मानकापुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले.
विशेष म्हणजे मनोरुग्ण सिकंदरवर अनेक महिन्यांपासून मनोरुग्णालयात उपचार सुरू होते. लॉकडाऊनच्या दरम्यान त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्यामुळे त्याला घरी आणण्यात आले. काही दिवस ठीक राहिल्यानंतर ऑगस्टमध्ये त्याची विकृती पुन्हा सुरू झाली. तो रात्री-बेरात्री शेजाऱ्यांना त्रास देत होता. पोलिसांनाही फोन करून दिशाभूल करणारी माहिती द्यायचा. आपल्याला कुणीतरी मारणार आहे, असे नेहमी म्हणायचा. त्याच्यामुळे शेजारीही वैतागले होते. वडील सम्राट रंगारी मात्र त्याची काळजी घ्यायचे. परंतु या नराधमाने त्यांनाच संपविले.
एक दिवसा अगोदरच घात
सिकंदरची विकृती वाढत असल्याचे पाहून घरच्यांनी त्याला पुन्हा मनोरुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुरुवारी त्याला कोरोनाची तपासणी करण्यासाठी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले जाणार होते. मात्र एक दिवसापूर्वीच त्याने वडिलांचा घात केला आणि स्वतः मनोरुग्णालयात पोहोचला.