लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, आराेग्य सेवक, आराेग्य सेविकांना सध्या जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात छत गळतीची गंभीर समस्या असून, छताला ताडपत्रीचा आधार द्यावा लागत आहे. दुसरीकडे, छत गळतीमुळे एखाद्या वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
प्राथमिक आराेग्य केंद्रालगत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. येथील बहुतेक सर्वच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला छत गळती हाेत आहे. थाेडादेखील पाऊस झाल्यास छत गळती हाेते. यामुळे कर्मचाऱ्यांना निवासस्थानाच्या छताला ताडपत्रीचा आधार द्यावा लागताे. छत गळतीमुळे स्लॅब वेळी-अवेळी गळून पडते. यामुळे एखाद्या वेळी छत काेसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांना भीतीच्या सावटाखाली येथे वास्तव्य करावे लागत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून छताची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.