लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरांच्या छतांवर सोलर रुफ टॉप लावणाऱ्यांसाठी अनुदान जारी झाले असले तरी महावितरणच्या कठोर अटी व शर्तीमुळे या याोजनेलाच झटका बसला आहे. परिस्थितीचा अंदाज यावरूनच लावता येतो की, यासाठी जारी झालेली निविदा केवळ ३१६ लोकांनी खरेदी केली तर निविदा भरणाऱ्यांची संख्या केवळ ८१ आहे. राज्यात या व्यवसायाशी तब्बल ६ हजार लोक जुळलेले आहेत, हे विशेष.
सौर ऊर्जा व्यावसायिकांची संघटना मास्माने महावितरणचे भांडवलदारांशी संगनमत असल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, २ वर्षा पूर्वी अनुदान योजनेंतर्गत काम करण्यासाठी ६०० लोक नोंदणीकृत झाले होते. परंतु यावेळी केवळ ८१ लोकांनीच टेंडर भरले. यापैकी केवळ ३० लोकच त्यासाठी पात्र ठरतील. संघटनेने म्हटले आहे की, साेलर रुफटॉपचे काम पूर्वी महाऊर्जेकडे होते. हे काम जेव्हापासून महावितरणकडे आले आहे, तेव्हापासून योजनाच संपविण्याचे प्रयत्न केले जात आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रासाठी केंद्राकडून केवळ २५ मेगावॅट अनुदान मागण्यात आले. दुसरीकडे गुजरातसारख्या राज्याने ६०० मेगावॅटचे अनुदान मागितले आहे. मास्माच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडत निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती व्यावहारिक करण्याची मागणी केली आहे.