नागपूर : वन विभागातील दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या रोपवनात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा महाराष्ट्र वनसेवानिवृत्त (पेन्शनर्स) असोसिएशनच्यावतीने आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यासंबंधी संघटनेने मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) बी. एस. के. रेड्डी व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. पी. एन. मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्या तक्रारीनुसार दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील चनोडा येथील १७२ हेक्टर व मसाळा, बिडमोहना व चारगाव बिटातील ५८ हेक्टर क्षेत्रात रोपवन करण्यात आले आहे. मात्र सध्या त्यापैकी ५ लाख रोपे मेली आहेत. यासंबंधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १ आॅगस्ट २०१५ रोजी दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील कक्ष क्र. ३६४ येथील संरक्षित वन मौजा चनोडा मिश्र रोपवन आराजी १७२ हेक्टरमधील रोपांची पाहणी केली. दरम्यान त्यांना रोपवनाच्या नावाखाली कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले. शिवाय पावसाळा सुरू असताना येथे केवळ १० टक्के रोपे जिवंत आढळून आली. तसेच रोपे लावण्यासाठी किमान १ फूट खोलीचे खड्डे आवश्यक असताना केवळ ३ ते ४ इंच खोलीचे खड्डयात झाडे लावण्यात आल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे, तर खड्डे खोदण्यासाठी प्रति खड्डा ९.५० पैसे दर असताना मजुरांना केवळ ४.२५ पैसे दराने मोबदला देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय टीसीएम मजुरांकडून खोदायचे असताना जेसीबीच्या मदतीने ते खोदण्यात आले. रोपवनासाठी स्वत: नर्सरी तयार न करता, नागपूर, भंडारा, अमरावती व हिंगणघाट येथून रोपे आयात करण्यात आली. यानंतर अर्धमेलेली रोपे लावण्यात आले, असे सांगण्यात आले आहे. संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु वरिष्ठांनी अजूनपर्यंत कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही. असेही संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चिमोटे म्हणाले. (प्रतिनिधी)
वन विभागात रोपवन घोटाळा!
By admin | Published: August 19, 2015 3:04 AM