कोरोना सुविधेसाठी रोटरीने दिले दीड कोटी रुपये : हायकोर्टात माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:45 PM2020-09-29T22:45:56+5:302020-09-29T22:47:41+5:30
नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १५० खाटांची व्यवस्था करण्याकरिता रोटरी इंटरनॅशनल क्लबने रोटरी क्लब नागपूरला दीड कोटी रुपये दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १५० खाटांची व्यवस्था करण्याकरिता रोटरी इंटरनॅशनल क्लबने रोटरी क्लब नागपूरला दीड कोटी रुपये दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली.
हे रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सरकार व महानगरपालिकेने हे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी वापरण्यास मोठा खर्च होईल अशी भूमिका मांडली होती. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन व रोटरी इंटरनॅशनल क्लबने हे रुग्णालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रोटरी क्लबने ७० आयसीयू खाटांसह एकूण १५० खाटांसाठी दीड कोटी रुपये दिले आहेत. उच्च न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेतली आहे.
प्रस्ताव सादर करण्याचा आदेश
इंडियन मेडिकल असोसिएशन व रोटरी इंटरनॅशनल क्लब यांची हे रुग्णालय सुरू करण्याची तयारी असली तरी, त्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर केला नसल्याचे मनपाने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने संबंधित प्रस्ताव दोन आठवड्यात सादर करण्याचा आदेश आयएमए व रोटरीला दिला. तसेच, मनपाला त्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्यास सांगितले.
इमारत वापरण्यायोग्य आहे का?
नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाची इमारत वापरण्यायोग्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मनपाला केली. तसेच, इमारतीची तपासणी करून एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.