लाेकमत न्यूज नेटवर्क
मेंढाला : साेयाबीनच्या पिकावर सुरुवातीला खाेडमाशी या किडीचा आणि नंतर येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने वासुदेव दंढारे, रा. वाढाेणा, ता. नरखेड येथील शेतकऱ्याचे दाेन एकरातील पीक पूर्णपणे नष्ट झाले. या दाेन एकरात मूठभर साेयाबीनचे उत्पादन हाेण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्याने शेतातील संपूर्ण साेयाबीनचे पीक राेटाव्हेटर फिरवून काढून टाकले.
यासंदर्भात वासुदेव दंढारे यांनी सांगितले की, साेयाबीनचे पीक दिवाळीआधी येत असल्याने तसेच त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याने आपण यावर्षी दाेन एकरात साेयाबीनची पेरणी केली हाेती. सुरुवातीला पिकाची अवस्था चांगली हाेती. मात्र, नंतर खाेडमाशीचा प्रादुर्भाव झाला. खाेडमाशी नियंत्रणात आणण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. फलधारणा व्हायला सुरुवात हाेताच येल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव झाला. हा राेग नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र, काहीही उपयाेग झाला नाही. उलट, संपूर्ण पीक पिवळे पडायला लागले. दाेन एकरात पायलीभर साेयाबीन हाेणार नसल्याने संपूर्ण पीक राेटाव्हेटरने काढून टाकण्याचा निर्णय घेतला, असेही वासुदेव दंढारे यांनी सांगितले.
वातावरणातील प्रतिकूल बदल, पावसाची अनियमितता, सततचे दमट वातावरण यासह अन्य कारणांमुळे पीक कीड व राेगाला बळी पडले, अशी माहिती कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. असाच प्रकार नरखेड तालुक्यातील मेंढला, वाढोणा, रामठी, हिवरमठ, आरंभी, उदापूर, बानोर (चंद्र), दावसा, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा, ताराउतारा, खलानगोदी, साखरखेडा, सिंजर, वडविहिरा, दातेवाडी, उमठा या शिवारात आढळून येताे. हातचे पीक गेल्याने शासनाने या संपूर्ण भागातील कीड व राेगग्रस्त साेयाबीनच्या पिकाचे सर्वेक्षण करून याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
...
कालबाह्य झालेले बियाणे
राेग व किडींना कायम नियंत्रणात आणणे शक्य नाही. कीड व राेगांपासून पिकांना वाचविण्यासाठी माेठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने एकीकडे उत्पादन खर्च वाढताे. बाजारात रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी ताेटाच पडताे. हल्ली आपल्या देशात वापरले जाणारे बहुतांश पिकांचे बियाणे कालबाह्य झाले आहेत. जगात किडी व राेगांना प्रतिबंधक असलेले बियाणे उपलब्ध आहे. केंद्र शासनाने त्या बियाण्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. शासनाने ही बंदी उठवून शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले ‘जीएम’ (जेनेटिकली माॅडिफाईड) बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मदन कामडे, रामचंद्र बहुरूपी, वसंतराव वैद्य, परीक्षित चरपे, संदीप सेंबेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
...
नुकसान भरपाई हा उपाय नाही
मागील चार वर्षापासून साेयाबीनचे पीक खाेडमाशी व येल्लाे माेझॅकमुळे उद्ध्वस्त हाेत आहे. दरवर्षी पिकाचे नुकसान हाेते व राजकीय नेत्यांद्वारे त्याचे राजकारण करीत नुकसान भरपाईची मागणी केली जाते. किडी व राेगांमुळे पिकांच्या हाेणाऱ्या दरवर्षीच्या नुकसानीवर नुकसान भरपाई हा उपाय नाही. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या शेतातील पिके वाचविण्यासाठी शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययाेजना करावी, अशी मागणीही नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.