लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धंतोली, सीताबर्डीकडे जाणाऱ्या दक्षिण नागपूरच्या रहिवाशांना वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून वेढा घेताना होणारा मनस्ताप आता थांबणार आहे. वंजारीनगर टाकी ते अजनी चौकपर्यंत सरळ डिपी रस्ता करण्यास शासनाने मान्यता दिली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती आमदार सुधाकर कोहळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. केंद्रीय विद्यालयाचा अडथळा दूर झाला असून रेल्वे मंत्रालयानेही या रस्त्याला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.दक्षिण नागपूरच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना वंजारीनगर पाण्याच्या टाकी ते टीबी वॉर्ड चौक असा दोन किलोमीटरचा वेढा घेऊन अजनी रेल्वे किं वा धंतोलीकडे जावे लागते. फेरा मारून जाताना वेळ वाया जात असल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पाण्याची टाकी ते अजनी पुलापर्यंतच्या डिपी रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. २००३-४ या काळात तसा प्रस्तावही तयार झाला होता. मात्र तो पूर्णत्वास येऊ शकला नाही. ही जागा रेल्वेची असल्याने रेल्वेकडून मंजुरी मिळत नव्हती व केंद्रीय विद्यालयाचाही अडथळा असल्याचे सांगण्यात येते. मात्र तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी राजकारण केल्याचा आरोप सुधाकर कोहळे यांनी केला. त्यांनी सांगितले की, या रस्त्याची पाहणी केल्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी संयुक्त बैठक घेत या डिपी रस्त्याला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, नगरसेविका वंदना भगत, विशाखा बांते, बापू चिखले, लता काटगाये, योगेश बंड, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.असा असेल रस्तायाअंतर्गत वंजारीनगर पाण्याच्या टाकीजवळून केंद्रीय विद्यालयाची सुरक्षा भिंत तोडून हा रस्ता थेट रेल्वे मेन्स हायस्कूलजवळ जोडण्यात येणार आहे. या रस्त्यात केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीचा थोडा अडथळा असून तो भाग तोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्यालयाजवळ अंडर पास काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डिपी रोडला मंजुरी मिळाली असून लवकरच याचे टेंडर काढून कामाला सुरुवात करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला.राजाबाक्षा व रमणा मारुती मंदिरासाठी पाच कोटीप्रसिद्ध राजाबाक्षा हनुमान मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने ४ कोटी ४२ लाख रुपये मंजूर केल्याचे आमदार कोहळे यांनी यावेळी सांगितले. यासोबत रमणा मारुती मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत ७७ लाख रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. इंदोरा बुद्ध विहाराच्या सौंदर्यीकरणासाठीही शासनातर्फे १ कोटी ४४ लाख रुपये मंजूर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.