लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ड्रग प्रकरणात रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी गोंदियाहून एका आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्हा कबूल केला आहे.
आरोपी अर्शद उर्फ अड्डू शब्बीर तिगाला (२१) रामनगर, बाजार चौक, गोंदिया निवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, १ जून रोजी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून एक बेवारस बॅग जप्त केली होती. तपासणीनंतर बॅगमधून २१.४९ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली होती. त्या वेळी आरोपी सापडला नव्हता. आरपीएफने जप्त केलेली ब्राऊन शुगर रेल्वे पोलिसांकडे सुपूर्त केली होती. या आधारावर रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी यांच्याकडे सोपविला होता.
भलावी यांनी प्रकरणाशी जुळलेली प्राथमिक माहिती, सीसीटीव्ही फूटेज आणि अन्य तांत्रिक माहितीची जुळवाजुळव करून चौकशी सुरू केली. त्यानुसार १० जूनला भलावी आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गोंदियाला गेले. तिथे आरोपीची माहिती घेतल्यानंतर आरोपीला पकडण्याची योजना आखली. याची माहिती मिळताच आरोपीने बाइकने पळून जाण्याचा प्रयत्न केला. जीआरपी पथकाने पाठलाग करून त्याला पकडले.
आरोपी अर्शद तिगाला याला नागपूर स्टेशनच्या जीआरपी ठाण्यात आणण्यात आले. विचारपूस केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. रेल्वे पोलीसचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आणि पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, सहायक उपनिरीक्षक चहांदे, हवालदार संजय पटले, नायक मिश्रा, सचिन, सिपाही मोगरे, खवसे, नरूले यांनी केली.